भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये खेळला गेला. या सामन्यात दोन खेळाडूंनी टीम इंडियासाठी पदार्पण केलं. आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीनं खळबळ माजवणारा मयंक यादव आणि अष्टपैलू नितीश रेड्डी यांना पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली. मयंक यादवनं ज्या पद्धतीनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती, अगदी पद्धतीनं टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दही सुरू केली. त्यानं आपल्या पहिल्याच सामन्यात वेगानं कहर केला.
सामना सुरू होण्यापूर्वी मयंक यादवला भारताचा माजी फिरकी गोलंदाज मुरली कार्तिकनं पदार्पणाची कॅप दिली. मयंक यादव पहिल्या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. त्यानं देखील चाहत्यांना अजिबात निराश केलं नाही. मयंकनं पहिलंच षटक मेडन टाकलं. यानंतर दुसऱ्या षटकात त्यानं बांगलादेशचा अनुभवी फलंदाज महमुदुल्लाहला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मयंक यादवनं पहिल्या 2 षटकात फक्त 3 धावा देत 1 बळी घेतला.
आपल्या या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर मयंक मोठा विक्रम केला आहे. आता तो टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्या आधी अर्शदीप सिंग आणि अजित आगरकर यांनी भारतासाठी हा पराक्रम केला होता. अर्शदीप सिंगनं 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतासाठी पदार्पण केलं होतं. तेव्हा त्यानं पहिलं षटक मेडन टाकलं. तर भारतीय संघाचे सध्याचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी 2006 मध्ये ही कामगिरी केली होती. जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यांनी पदार्पणात पहिले षटक मेडन टाकलं होतं. आता या यादीत मयंक यादवचाही समावेश झाला आहे.
मयंक यादव आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीनं चर्चेत आला होता. त्यानं आयपीएल 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला होता. या शानदार कामगिरीनंतर त्याची भारतीय संघात निवड झाली.
हेही वाचा –
‘सिक्सर किंग’ सूर्या! जोस बटलरला टाकलं मागे, आता रोहितचा रेकॉर्ड निशाण्यावर
बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर भारताच्या नावे अनेक विक्रम! पॉवरप्लेमध्ये मोठा पराक्रम
IND vs BAN; भारताचा बांगलादेशवर 7 गडी राखून दमदार विजय!