---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईच्या संघाची निराशाजनक कामगिरी, निवड समिती अध्यक्षांनी ‘हे’ बदल करण्याची केली मागणी

On: सोमवार, जानेवारी 25, 2021 12:25 AM
---Advertisement---

नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या साखळी फेरीत मुंबईच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली. या संपूर्ण स्पर्धेत मुंबईच्या संघाला केवळ एका सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत उतरलेल्या मुंबईच्या संघाला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यापूर्वीच गाशा गुंडाळावा लागला.

या पार्श्वभूमीवर मुंबईचे निवड समिती अध्यक्ष सलील अंकोला यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे महत्वाची मागणी केली आहे. अंकोला यांनी आगामी विजय हजारे स्पर्धेसाठी (राष्ट्रीय वनडे स्पर्धा) खेळाडूंची निवड अधिक लवकर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. मुश्ताक अली स्पर्धेतील अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्याची गरज असल्याचे अंकोला यांचे म्हणणे आहे.

अंकोला यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपले म्हणणे मांडले आहे. या पत्रात ते म्हणाले, “मला नुकतेच असे कळाले आहे की मुंबईचे मुख्य प्रशिक्षक अमित पागनीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआय फेब्रुवारीच्या मध्यात विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन करण्याच्या विचारात आहे. मात्र अजून याबाबत खात्रीशीर काही ठरले नाही आहे.”

पुढे ते म्हणाले, “मी तुम्हाला विनंती करतो की निवड समितीला या स्पर्धेसाठी संभावित संघाची निवड करण्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी. जेणेकरून पुढील योजना आखणे सोपे जाईल. संघाचे स्वरूप निश्चित करणे सोपे जाईल. आम्हाला तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यामुळे मुश्ताक अली ट्रॉफीतील चुकांची पुनरावृत्ती टाळता येईल.”

दरम्यान, मुश्ताक अली स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर मुंबईचे मुख्य प्रशिक्षक अमित पागनीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मेल करून तसे कळवले आहे. असोसिएशनच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

इंग्लंडने आपला सर्वोत्तम ताकदीचा संघ न उतरवणे, हा भारताचा अपमान असेल

राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला मनाचा मोठेपणा; युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय नाकारत म्हणाले

पाकिस्तान संघाचे भारताच्या पावलावर पाऊल; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तब्बल इतक्या नवोदित खेळाडूंना संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---