लंडन। रविवारी(23 नोव्हेंबर) एटीपी फायनल्सच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने जिंकले. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असेलेल्या डॅनिलने अंतिम सामन्यात ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिमचा पराभव केला. मेदवेदेवचे हे एटीपी फायनल्सचे पहिले विजेतेपद आहे.
2 तास 42 मिनिटे चाललेल्या अंतिम लढतीत डॅनिलने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या थिमला 4-6, 7-6(2), 6-4 अशा तीन सेटमध्ये पराभूत केले. त्याने पहिला सेट गमावल्यानंतर सामन्यात चांगले पुनरागमन केले. दुसरा सेट डॅनिलने टायब्रेकरमध्ये जिंकून सामन्यात बरोबरी साधली होती. त्यानंतर त्याने तिसरा सेट सहज जिंकून विजेतेपदाला गवसणी घातली
सर्वात मोठा अंतिम सामना –
थिम आणि डॅनिलमधील अंतिम सामना हा एटीपी फायनल्सच्या इतिहासातील सर्वाधिक काळ चाललेला तीन सेटचा अंतिम सामना होता.
एटीपी फायनल्सच्या एकाच स्पर्धेत अव्वल तीन क्रमांकाच्या खेळाडूंना केले पराभूत
थिमचा पराभव केल्यामुळे आता एटीपी फायनल्सच्या एकाच स्पर्धेत जागतिक क्रमवारीत पहिल्या तीन क्रमांकावर असणाऱ्या खेळाडूंना पराभूत करणारा डॅनिल पहिला खेळाडू ठरला आहे. तर 1990 नंतर कोणत्याही एकाच स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील पहिल्या तीन खेळाडूंना पराभूत करणारा चौथा खेळाडू ठरला आहे.
याआधी असा पराक्रम डेविड नाल्बान्दिएन (2007, मद्रिद), नोवाक जोकोविच (2007, मॉन्ट्रिएल), बोरीस बेकर (1994 स्टॉकहोम) यांनी केला आहे.
24 वर्षीय डॅनिलने थिमच्या आधी उपांत्यफेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राफेल नदालचा तर साखळी फेरीत अव्वल क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोविचचा पराभव केला होता.
मागीलवर्षी मिळाला नव्हता एकही विजय –
विशेष म्हणजे डॅनिल मागीलवर्षी देखील एटीपी फायनल्स खेळला होता. मात्र त्यावेळी त्याला एकही सामना जिंकता आलेला नव्हता. त्याला केवळ एक सेट जिंकता आला होता आणि आता यावर्षी या स्पर्धेत तो एकही सामना पराभूत झालेला नाही.
थिम सलग दुसऱ्यांदा उपविजेता –
थिम सलग दुसऱ्यांदा एटीपी फायनल्सच्या अंतिम सामन्यात पोहचला होता. पण दोन्ही वेळेस त्याला विजेतेपदाने हुलकावणी दिली. मागीलवर्षी त्याला अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपासकडून पराभूत व्हावे लागले होते. तर यंदा तो डॅनिलकडून पराभूत झाला.
सलग 6 व्या वर्षी वेगळा विजेता –
गेल्या 6 वर्षापासून एटीपी फायनल्सला वेगवेगळे विजेते खेळाडू मिळत आहे. यंदा या स्पर्धेला वेगळा विजेता मिळण्याचे सलग 6 वे वर्ष आहे. याआधी 2015 मध्ये जोकोविचने, 2016 मध्ये अँडी मरेने, 2017 मध्ये दिमिट्रोवने, 2018 मध्ये ऍलेक्झांडर झ्वेरेव आणि 2019 मध्ये स्टिफानोस त्सित्सिपासने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. तर आता डॅनिलचे नावही विजेतेपद मिळवणाऱ्या खळाडूंमध्ये सामील झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ATP Finals: थिम आणि मेदवेदेव अंतिम सामन्यात येणार आमने-सामने
ATP Finals: गतविजेत्याला पराभूत करत राफेल नदालचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश
ATP Finals: स्टार टेनिसपटू जोकोविचला धूळ चारत मेदवेदेवची उपांत्य फेरीत धडक