येत्या १५ ऑक्टोबर रोजी आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या रविवारचा (१० ऑक्टोबर) हा टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात बदल करण्याची ही शेवटची संधी असणार आहे. अशातच भारतीय संघात देखील काही महत्वाचे बदल केले जाऊ शकतात, ज्यामध्ये संघाचा मेंटॉर एमएस धोनी मोलाची भूमिका पार पाडू शकतो.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय खेळाडूंची यादी जाहीर केली होती. या संघात स्थान देण्यात आलेल्या सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनला आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ज्यामुळे त्यांना संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. परंतु सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात या दोघांनी जोरदार पुनरागमन केले आहे, तर दुखापतग्रस्त वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पंड्या यांच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पंड्याची गोलंदाजी आणि वरून चक्रवर्तीची फिटनेस या दोन्ही गोष्टींमुळे बीसीसीआयच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता या प्रकरणात आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी मेंटॉर म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या एमएस धोनीचे मत मोलाची भूमिका बजावणार आहे. बोर्डाच्या सूत्राने म्हटले की, “वरुण चक्रवर्तीची फिटनेस जास्त चिंतेच कारण नाहीये, कारण वरुणला केवळ ४ षटक गोलंदाजी करायची आहे. त्याचा योग्यवेळी वापर केला जाईल. मात्र, रचनेत हार्दिक पंड्याचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. याबाबत धोनी, शास्त्री आणि कोहली यांना एकत्र येऊन निर्णय घ्यावा लागेल.”
तसेच सूत्राने पुढे म्हटले की, “भारतीय संघासाठी सर्वात मोठी चिंता हार्दिक पंड्या आहे. जेव्हा गोष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची असते, त्यावेळी हार्दिक पंड्या हा खास खेळाडू असतो. विचार करा की, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या हे दोन्ही सामना जिंकवणारे खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. जर हार्दिक पंड्या गोलंदाजी करू शकत नसेल, तर तो निष्प्रभ ठरेल. अशा परिस्थितीत संघाला विचार करावा लागेल.” तसेच हार्दिक पंड्याला फलंदाज म्हणून स्थान देण्याबाबत सूत्राने म्हटले की, “हे ते क्षेत्र आहे, ज्याचा रवी शास्त्री, धोनी आणि विराटला एकत्र येऊन निर्णय घ्यावा लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
-रवी शास्त्रींनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण? ‘या’ नव्या परदेशी दिग्गजाचे नाव चर्चेत
-इशान-सूर्यकुमारच्या फटकेबाजीपुढे पियुष चावलाचा ‘मोठा’ विक्रम राहिला दुर्लक्षित!