जगप्रसिद्ध असलेल्या फोर्ब्स या अमेरिकन व्यावसायिक मॅगेझिनने नुकतीच टॉप- १०० श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये जगभरातील अनेक खेळाडूंचा समावेश आहे. मैदानासोबतच मैदानाच्या बाहेरही आपला जलवा दाखवणारा लिओनेल मेस्सी या यादीत अव्वलस्थानी आहे. मेस्सी मागील काही वर्षांपासून जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. बुधवारी म्हणजेच १० मे, २०२२ रोजी जारी झालेल्या फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, मेस्सीने एनबीए स्टार लिब्रोन जेम्स आणि मॅनचेस्टर युनायटेडचा ख्रिस्तियानो रोनाल्डोला पछाडले आहे. विशेष म्हणजे, फोर्ब्स टॉप- १००मध्ये फक्त एका क्रिकेटपटूचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया जगभरातील सर्वाधिक कमाई करणार्या ५ खेळाडूंबद्दल…
सर्वाधिक कमाई करणारे ५ खेळाडू
लियोनेल मेस्सी (१३९४ कोटी रुपये)
लियोनेल मेस्सी (Leonel Messi) याने आपल्या १२ महिन्यांच्या जाहिरातीच्या करारादरम्यान ५५ मिलियन डॉलर्सची म्हणजेच सव्वा चार अब्ज रुपयांची कमाई केली. मागील वर्षी मेस्सीची एकूण संपत्ती १३० मिलियन डॉलर्स म्हणजेच १३९४ कोटी रुपये होती. बार्सिलोनाकडून कमी पगारात पीएसजी संघात आलेला मेस्सी भरमसाठ पैसा कमावतो. मागील वर्षी तो आयरिश मिश्र मार्शल आर्ट्स फायटर कॉनोर मॅकग्रेगरनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता.
लेब्रोन जेम्स (९३९ कोटी रुपये)
एनबीए म्हणजेच नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन खेळाडू लेब्रोन जेम्स (Lebron James) कमाईच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. ‘स्पेस जॅम’ या सिनेमाात झळकलेला लेब्रोन एक टॉक शोदेखील करतो, जो नुकताच एचबीओ चॅनेलवरून युट्यूबवर पाठवण्यात आला. जेम्सने प्रोडक्शन कंपनीकडून एक असा करार केला, ज्याने त्याला एकाच झटक्यात मालामाल बनवले. जेम्सने मागील १२ महिन्यात १२१.१ मिलियन डॉलर म्हणजेच ९३९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये ४१.२ मिलियन डॉलर्स हे खेळामार्फत आणि ८० मिलियन डॉलर्स हे जाहिरात आणि इतर माध्यमांतून मिळाले आहेत.
क्रिस्टियानो रोनाल्डो (८९० कोटी रुपये)
मँचेस्टर युनायटेडचा सर्वात मोठा चेहरा असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) हा कमाईच्या बाबतीत मागे नाही. गेल्या १२ महिन्यांत त्याने ११५ मिलियन डॉलर म्हणजेच ८९० कोटी रुपये कमावले. अनेक चाहते पोर्तुगालच्या या दमदार खेळाडूला इंस्टाग्रामवर फॉलो करतात. सोशल मीडियावर एका पोस्टसाठी तो करोडो रुपये घेतो. त्याच वेळी, हॉटेल चेन, कपड्यांचे ब्रँड असे अनेक व्यवसाय आहेत, जे रोनाल्डोच्या संपत्तीत भर घालतात.
नेमार ज्युनिअर (७३५ कोटी रुपये)
नेमार ज्युनिअर (Neymar Junior) याची ख्याती जगभरात आहे. त्याच्या ७३५ कोटी रुपये या कमाईचा आकडा वाचून कोणाच्याही भुवया उंचावू शकतात. ब्राझीलचा फुटबॉलपटू, पूमा, रेड बुल, नेटफ्लिक्स यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या जाहिराती करतो. फ्रेंच क्लब म्हणजेच पॅरिस सेंट जर्मनसोबतही त्याचा मोठा करार आहे. ३० वर्षीय नेमारने मागील वर्षात ९५ मिलियन डॉलर्सची कमाईक केली आहे. यामध्ये २५ मिलियन डॉलर्स म्हणजेच १९३ कोटी रुपये फक्त जाहिरातींमधून आले आहेत.
स्टीफन करी (७१८ कोटी रुपये)
गोल्डन स्टेट वॉरियर्सचा स्टार बास्केटबॉलपटू स्टीफन करी (Stephen Curry) याची कमाई ९२.८ मिलियन डॉलर्स म्हणजेच ७१८ कोटी रुपये आहे. तो या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्या कमाईपैकी ४५.८ मिलियन डॉलर्स रुपये खेळामार्फत मिळाले आहेत. तसेच, ४७ मिलियन डॉलर्स हे जाहिरातींमधून मिळाले आहेत. तो या वर्षी एनबीएमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू देखील होता. पुढील हंगामात तो सुमारे ४८ मिलियन डॉलर्स रुपये कमावेल.
टॉप- १०० श्रीमंत खेळाडूंमध्ये विराट कोहली एकमेव भारतीय
भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर या यादीत विराट कोहली (Virat Kohli) या एकमेव खेळाडूचे नाव येते. तो टॉप- १००मध्ये ६१व्या स्थानावर आहे. मागील वर्षी विराटची कमाई २६२ कोटी रुपये होती. जाहिरातींमधून त्याला २४० कोटी आणि २२ कोटी रुपये हे खेळामधून मिळाले होते. विराटने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ७० शतके आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा