पुढील वर्षाच्या सुरुवातीला संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) इंटरनॅशनल लीग टी२० नावाची नवीकोरी लीग सुरू होणार आहे. ही लीग जगातील दुसरी सर्वात श्रीमंत लीग असेल, असे म्हटले जात आहे. या लीगसाठी सहा संघ अंतिम झाले आहेत. त्यापैकी तीन संघ आयपीएलमधील संघमालकांनी विकत घेतले आहेत. त्यातील मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या एमआय एमिरेट्स संघाने आपल्या खेळाडूंना करारबद्ध केल्याची बातमी समोर येत आहे.
मुंबई इंडियन्सचे मालक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या दक्षिण आफ्रिका टी२० लीगमध्ये ‘एमआय केपटाऊन’ आणि युएईतील लीगमध्ये ‘एमआय एमिरेट्स’ हे संघ विकत घेतले आहेत. त्यापैकी केपटाऊन संघासाठी त्यांनी नुकतेच पाच खेळाडू करारबद्ध केले आहेत. यामध्ये राशिद खान, कगिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन व डेवाल्ड ब्रेविस यांचा समावेश आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून केली गेली होती.
त्याचप्रमाणे, एमिरेट्स संघासाठीही खेळाडू करारबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बोलले जात आहे. काही आघाडीच्या क्रिकेट संकेतस्थळांनी दिलेल्या वृत्तानुसार, एमआय एमिरेट्स संघासाठी कायरन पोलार्ड, निकोलस पूरन, ड्वेन ब्राव्हो यांना करारबद्ध करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्याचप्रमाणे द हंड्रेड लीगमध्ये पहिला शतकवीर होण्याचा मान मिळवलेल्या २० वर्षीय विल स्मिड यालादेखील एमआय एमिरेट्स करारबद्ध करण्यास इच्छुक आहे. याव्यतिरिक्त श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका, ओली पोप व फजलहक फारुखी यांना देखील ते करारबद्ध करणार आहेत.
इंटरनॅशनल लीग टी२० मध्ये आयपीएलमधील मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्स या संघांनी देखील फ्रॅंचाईजी घेतली आहे. त्यापैकी अबुधाबी नाईट रायडर्सने आंद्रे रसेल व सुनील नरीन यांच्याशी बोलणे अंतिम केल्याचे सांगितले जातेय. मात्र, संघ व्यवस्थापनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsPAK: दुबईचे मैदान अन् रोहित शून्यावर बाद! चाहत्यांच्या कायम लक्षात राहिलेला ‘तो’ सामना
Asia Cup 2022 | पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी विराटने सुरू केला सराव, पाहा व्हिडिओ
Asia Cup 2022 | बुमराहच्या अनुपस्थितीत चमकदार कामगिरी करू शकतात भारताचे ‘हे’ तीन गोलंदाज






