रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आणि श्रेयस अय्यरचा कोलकाता नाईट रायडर्स संघ बुधवारी (६ एप्रिल) आमने- सामने असणार आहे. आयपीएल २०२२चा हा १४वा सामना असेल, जो पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात ‘हिटमॅन’ रोहित शर्मा स्वतःच्या नावावर मोठ्या विक्रमांची नोंद करू शकतो. मुंबई इंडियन्सने चालू हंगामात खेळलेल्या त्यांच्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करला आहे. अशात हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे, तर दुसरीकडे केकेआरने खेळलेल्या ३ पैकी २ सामने जिंकले आहेत.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जर या सामन्यात ५४ धावांची यशस्वी खेळी करू शकला, तर तो टी२० क्रिकेटमध्ये स्वतःच्या १०००० धावा पूर्ण करेल. टी२० क्रिकेटमध्ये वैयक्तिक १०००० धावा करणारा रोहित, विराट कोहली (Virat Kohli) नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू बनू शकतो. या यादीत म्हणजेच टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेल (Chris Gayle) आहे.
विराटने त्याच्या टी२० कारकिर्दीत आतापर्यंत ३२८ सामने खेळले आहेत आणि यामध्ये १०३२६ धावा केल्या आहेत. रोहितच्या टी२० कारकीर्दीचा विचार केला, तर त्याने खेळलेल्या ३७२ सामन्यांमध्ये ९९४६ धावा केल्या आहेत. रोहित वैयक्तिक १०००० टी२० धावा करण्यापासून अवघ्या ५४ धावा दूर आहे आणि केकेआरविरुद्ध तो ही कामगिरी साकारू शकतो. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस गेलने ४६७ टी२० सामन्यांमध्ये १४५६२ धावा केल्या आहेत.
रोहितने केकेआरविरुद्धच्या या सामन्यात स्वतःच्या ८ धावा पूर्ण केल्या, तरी तो एका मोठ्या विक्रमाची नोंद स्वतःच्या नावावर करेल. या सामन्यात रोहितने ८ धावा केल्यास तो स्वतःच्या ४५०० धावा पूर्ण करेल. आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा तो मुंबई इंडियन्सचा पहिला खेळाडू असेल. एवढेच नाही, कोलकाताविरुद्ध रोहितने एकूण १०१५ धावा केल्या आहेत. एखाद्या आयपीएल फ्रँचायझीविरुद्ध १००० धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
मुंबई इंडियन्स आणि केकेआर सामन्यांचा इतिहास पाहिला, तर या दोन संघात आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सने २२, तर केकेआरने ७ सामने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये एखाद्या फ्रँचायझीविरुद्ध दुसऱ्या फ्रँचायझीने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
महत्वाच्या बातम्या –
विनिंग शॉट! आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या हर्षल पटेलच्या खणखणीत षटकाराचा Video व्हायरल