भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने मेलबर्नमधील भारताच्या कसोटी विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. कर्णधार अजिंक्य रहाणेसह भागीदारी करताना त्याने फलंदाजीत शानदार अर्धशतक झळकावले. तर गोलंदाजीतदेखील ३ बळी मिळवत आपली भूमिका चोख निभावली. याशिवाय त्याने दोन ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे अवघड झेलही घेतले.
मात्र त्याच्या या सामना जिंकवून देणाऱ्या योगदानानंतरही ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसी समाधानी नाही. जडेजा पहिल्या सहा क्रमांकामध्ये फलंदाजी करण्यास अजूनही सक्षम नाही, असे मत हसीने मांडले आहे.
“फलंदाजीबाबत खात्री नाही”
जडेजाबाबत बोलताना हसी म्हणाला, “मी जडेजाच्या खेळाचा मोठा चाहता आहे. मला असे वाटते की गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्या फलंदाजीत निश्चितच सुधारणा झाली आहे. तो आत्मविश्वासाने आणि सातत्यपूर्ण फलंदाजी करतो आहे. मात्र तो पहिल्या सहा क्रमांकात फलंदाजी करू शकतो का, हा खरा प्रश्न आहे.”
जडेजाच्या फलंदाजी क्रमाबाबत हसीने पर्याय देखील सुचविला. तो म्हणाला, “मला असे वाटते की फलंदाजीसाठी सातवा क्रमांक जडेजासाठी योग्य ठरेल. संघासाठी तो या क्रमांकावर उपयुक्त धावा काढू शकतो. ज्यावेळी तुम्हाला पहिल्या सहा क्रमांकामध्ये फलंदाजी करायची असते त्यावेळी तुम्हाला मोठ्या खेळी करता येणे, आवश्यक असते. जडेजामध्ये ही क्षमता आहे की नाही याबद्दल मी साशंक आहे.”
मात्र माजी फलंदाज टॉम मूडी यांनी याच्या विरुद्ध मत मांडले. ते म्हणाले, “रवींद्र जडेजा हा सगळ्या फॉरमॅटमध्ये आणि सगळ्या परिस्थितीत गुणवान अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने ५० कसोटी सामने खेळले असून त्यातील ३३ मायदेशात तर १७ विदेशात खेळले आहेत. माझं मत आहे कि तो त्याच्या कारकिर्दीतील नवा अध्याय सुरु करण्यासाठी सज्ज झाला आहे. इथून पुढे तो महत्वाचा गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज म्हणून ओळखला जाईल. संघासाठी त्याचे योगदान समतोल प्राप्त करून देणारे असेल.”
दिग्गजांनी व्यक्त केलेल्या या मतांनंतर आता जडेजा उर्वरित कसोटी मालिकेत कसे प्रदर्शन करतो याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या मालिकेतील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर खेळविण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या:
युवा खेळाडूंनी विलियम्सनचा आदर्श घ्यावा, न्यूझीलंडच्या कर्णधाराची भारताच्या माजी खेळाडूकडून स्तुती
भारतीय संघावर टीका करणाऱ्या ऑस्ट्रेलियन मंत्र्याला वसीम जाफर यांचे सडेतोड उत्तर, केले असे ट्विट
व्हिडिओ : सुपरमॅन आंद्रे फ्लेचर! एकाच सामन्यात पकडले दोन अविश्वसनीय झेल