ऍशेस मालिकेतील (ashes series) पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंवर ९ विकेट्स राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज खेळाडू माईक हसी (mike hussey) याने इंग्लंडचा महत्वाचा खेळाडू बेन स्टोक्सविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या सामन्यादरम्यान बेन स्टोक्स (ben stokes) याला दुखापत झाल्याचे दिसले. त्यानंतर हसीने ही प्रतिक्रिया दिली आहे. हसीच्या मते स्टेक्सच्या दुखापतीमुळे इंग्लंड संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
बेन स्टोक्सला पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. त्याच्या दुखापतीमुळे इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. स्टोक्सने ऍशेस मालिकेतून मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन केले आहे. मात्र, मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याला दुखापत झाली आहे. २९ व्या षटकात एक चेंडू पकडताना त्याला ही दुखापत झाली. अशात स्टोक्स दुसऱ्या कसोटी सामन्यात उपस्थित असेल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना स्टोक्सच्या दुखापतीविषयी हसीने त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “इंग्लंडसाठी ही चिंतेची गोष्ट आहे. स्टोक्स एक जागतिक पातळीचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि संघाचा महत्वाचा भाग आहे. तो संघाला खूप संतुलित बनवतो. तो एकटा तीन खेळाडूंचे काम करतो. असे वाटत होते की, तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे, जी सामन्यात अधिक वाढत गेली”
दरम्यान, बेन स्टोक्सने या ऍशेस मालिकेच्या आधी काही माहिन्यांपासून क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली होती. त्याने या विश्रांतीमागे त्याच्या मानसिक आरोग्याचे कारण सांगितले होते. या काळात त्याने त्याच्या हाताच्या बोटाच्या दुखापतीवर देखील इलाज केला. विश्रांतीच्या काळात त्याने हातच्या बोटाची शस्त्रक्रिया केली. या काळात स्टोक्सने टी-२० विश्वचषकासोबतच इतर अनेक मालिकांमधून माघार घेतली होती. अशात त्याने मोठ्या काळानंतर मैदानावर पुनरागमन केले. मात्र, पुन्हा त्याला दुखापतीमुळे मैदानाच्या बाहेर बसण्याची वेळ येऊ शकते.
महत्वाच्या बातम्या –
राष्ट्रीय हॉकी: मणिपूर संघाचा गोलांचा पाऊस, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ५ सामन्यात ७४ गोल
दुसरा ऍशेस सामना डेविड वॉर्नर खेळणार का? पॅट कमिन्सने दिली महत्त्वाची माहिती