कोरोना व्हायरस या जागतिक महामारीमुळे जवळपास सर्वच क्रिकेटपटू आपापल्या घरात वेळ घालवत होते. अशात अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या सार्वकालिन एकादश संघांची निवड केली आहे. त्याप्रमाणेच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही त्याचा विचित्र असा सार्वकालिन कसोटी एकादश संघ निवडला आहे.
या संघाला विचित्र यामुळे म्हटले आहे की, वॉनने आपल्या संघात सर्व टक्कल असणाऱ्या खेळाडूंना स्थान दिले आहे. याची माहिती त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन दिली आहे.
ग्रॅहम गूच आणि हर्शल गिब्ज – सलामीवीर फलंदाज
इंग्लंडचे माजी फलंदाज ग्रॅहम गूच हे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक होते, तर दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्ज हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात होता. ग्रॅहम गूच यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत २० शतके केली होती, तर गिब्जने एकूण १४ शतके करण्याचा पराक्रम केला होता. त्यांच्या या दमदार खेळीमुळे वॉनने ग्रॅहम आणि गिब्जला आपल्या संघात सलामीला फलंदाजी करण्यासाठी निवडले आहे.
हाशिम अमला, डॅरेन लेहमन आणि जोनाथन ट्रॉट – मधल्या फळीतील फलंदाज
वॉनने दक्षिण आफ्रिकाचा हाशिम अमलाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवडले आहे. गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या अमलाला सर्वश्रेष्ठ सलामीवीर फलंदाजांमध्ये गणले जाते. तर, ऑस्ट्रेलियाचे दिग्गज डावखुरे फलंदाज डॅरेन लेहमन यांना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी स्थान देण्यात आले आहे. शिवाय, ५व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी वॉनने इंग्लंडच्या जोनाथन ट्रॉटला संधी दिली आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये जन्मलेला ट्रॉट याला २०११मध्ये आयसीसी आणि ईसीबीने ‘क्रिकेटर ऑफ द ईयर’ निवडले होते.
ब्रायन क्लोज – कर्णधार
वॉनने टक्कल असणाऱ्या या सार्वकालिन कसोटी एकादश संघाचे नेतृत्त्व इंग्लंडच्या अनुभवी क्रिकेटपटू ब्रायन क्लोज यांच्याकडे सोपवले आहे. १९४९मध्ये इंग्लंडकडून कसोटीत पदार्पण करणारे ब्रायन हे सर्वात युवा खेळाडू होते. आपल्या कारकिर्दीत ७ कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्त्व करताना ब्रायन यांनी ६ सामने जिंकले होते. त्यामुळे वॉनने आपल्या संघाचे नेतृत्त्व त्यांच्याकडे सोपवले आहे. तसेच त्यांना संघात ६व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी स्थान दिले आहे.
मॅट प्रायर – यष्टीरक्षक फलंदाज
वॉनने आपल्या सार्वकालिन कसोटी एकादश संघात यष्टीरक्षण करण्यासाठी इंग्लंडचा माजी यष्टीरक्षक फलंदाज मॅट प्रायरची निवड केली आहे. तसेच तो संघातील ७व्या क्रमांकाचा फलंदाज असेल. त्याने इंग्लंडकडून ७९ कसोटी, ६८ वनडे आणि १० टी२० सामने खेळले होते.
डग बोलिंगर, राणा नावेद उल हसन, नेथन लायन, जॅक लीच/ख्रिस मार्टिन – गोलंदाज
वेगवान गोलंदाजीसाठी वॉनने ऑस्ट्रेलियाचा डग बोलिंगर, पाकिस्तानचा राणा नावेद उल हसन यांची निवड केली आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा नेथन लायन याला फिरकी गोलंदाजीसाठी निवडण्यात आले आहे. वॉनच्या या संघातील ११व्या खेळाडूसाठी थोडा गोंधळलेला दिसून आला. म्हणून त्याने ११व्या स्थानासाठी २ गोलंदाजांची संयुक्तपणे निवड केली आहे. यामध्ये इंग्लंडच्या फिरकीपटू जॅक लीच आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस मार्टिन यांचा समावेश आहे.
असा आहे मायकल वॉनचा सार्वकालिन कसोटी एकादश संघ –
ग्राहम गूच, हर्शल गिब्ज, हाशिम अमला, डॅरेन लेहमन, जोनाथन ट्रॉट, ब्रायन क्लोज (कर्णधार), मॅट प्रायर (यष्टीरक्षक), डग बोलिंगर, राणा नावेद उल हसन, नेथन लायन, जॅक लीच/ख्रिस मार्टिन
ट्रेंडिंग घडामोडी-
-धोनीने वाचवला पक्ष्याचा जीव; मुलगी झिवाने शेअर केले फोटो
-क्रिकेटच्या पंढरीत बरोबर ३४ वर्षांपुर्वी टीम इंडियाने पहिल्यांदा…
-जाफरच्या ऑलटाईम वनडे ११मध्ये नाही सेहवागला स्थान, माजी खेळाडूने व्यक्त…