जसप्रीत बुमराहने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे. त्याच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने अनेक मोठ्या सामन्यांत विजय देखील मिळवले आहेत. त्यामुळे तो भारताचा एक मॅचविनर खेळाडू म्हणून गेल्या काही वर्षात समोर आला आहे. त्याने त्याच्या गोलंदाजीची धार नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडलेल्या केपटाऊन कसोटीदरम्यान देखील दाखवली होती. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता.
बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ५ गडी बाद केले आणि आपल्या कसोटी कारकिर्दीत सातव्यांदा ही कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताला १३ धावांची आघाडी मिळाली होती.
बुमराहची गोलंदाजी पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने देखील ट्वीट करत आपले मत मांडले असून त्याला क्रिकेट चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे. त्याने ट्वीटमध्ये बुमराहला सर्वोत्कृष्ट गोलंदाज मानलं आहे. वॉनने म्हटलं आहे की, बुमराह किती शानदार आहे, सध्या सर्व फॉरमॅटमध्ये तो जगातील सर्वश्रेष्ठ आहे. मायकल वॉन अशा माजी खेळाडूंपैकी एक आहेत जे संधी मिळताच भारतीय संघावर टीका करण्यात मागे हटत नाहीत. अशातच वॉनने भारतीय खेळाडूचे कौतुक केले म्हणजे ही निश्चितच मोठी गोष्ट आहे.
How good is @Jaspritbumrah93 !!! I reckon across all formats he is the best in the World at the moment .. #SAvIND
— Michael Vaughan (@MichaelVaughan) January 12, 2022
गतवर्षी भारतीय संघ कोरोनाच्या कारणानेने इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पाचवा सामना खेळला नव्हता, तेव्हा वॉनने भारतीय संघ आणि बीसीसीआयवर बरीच टीका केली होती. दुसऱ्या बाजुला वॉनच्या टीकांना नेहमीच चोख उत्तर देणारा भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनेसुद्धा मीम्स शेअर करत बुमराहचे कौतुक केले आहे. जाफरने मार्को जेन्सनला बाद करण्यावरुन मीम शेअर केले आहेत.
Those who do not learn history are doomed to repeat it. Just phenomenal @Jaspritbumrah93 🙌🏻 #SAvIND pic.twitter.com/lguXZQsL0p
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) January 12, 2022
बुमराहने २०१८ कसोटीत केपटाउनमध्येच पदार्पण केले होते. त्याचबरोबर आफ्रिकेचा माजी गोलंदाज शॉन पोलॉकनेसुद्धा बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. पोलॉक म्हणाला की, आफ्रिकेच्या गोलंदाजांना बुमराहने सर्वात जास्त त्रास दिला, तो एक महान गोलंदाज आहे. त्याला गोलंदाजी करताना पाहणे आश्चर्यकारक आहे.
केपटाऊन कसोटीत भारताचा पराभव
भारताने पहिल्या डावात बुमराहच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर १३ धावांची आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या डावात भारतीय संघाची फलंदाजी कोलमडली. केवळ रिषभ पंतला शतकी खेळी करण्यात यश आले. अन्य फलंदाज ३० धावांचा आकडाही पार करू शकले नाहीत. भारताचा दुसरा डाव १९८ धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला २१२ धावांचेच आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने केवळ ३ विकेट्स गमावत पूर्ण केला. दुसऱ्या डावात बुमराहला १ विकेट घेण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हीच योग्य वेळ’, म्हणत एबी डिव्हिलियर्सने सांगितले निवृत्तीमागचे खरे कारण
रवी शास्त्री बनले दक्षिण आफ्रिकेच्या पीटरसनचे फॅन; म्हणाले, लहानपणीच्या ‘या’ हिरोची झाली आठवण
व्हिडिओ पाहा – १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?