मायकेल वॉनने विराट कोहलीवर केलेल्या टीकेनंतरचा वाद अद्याप शमण्याची चिन्हे नाहीत. मायकेल वॉनने विराट कोहली आणि केन विलियम्सनची तुलना करतांना अप्रत्यक्षपणे कोहलीला केवळ लोकप्रियतेमुळे श्रेष्ठ मानले जात असल्याचे विधान केले होते. या विधानावर त्यानंतर अनेकांनी टीका केली होती. यात पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बट्टचा देखील समावेश होता.
सलमान बट्टने ‘ज्यांच्या नावावर एकही वनडे शतक नाही, त्यांनी ७० शतके नावे असलेल्या फलंदाजांबाबत बोलू नये’, असा वॉनला वर्मी लागणारा टोला मारला होता. आता मायकेल वॉनने याला जोरदार प्रत्युत्तर दिले असून त्याने सलमान बट्टला त्याच्या मॅच फिक्सिंग प्रकरणाची आठवण करून दिली आहे.
काय आहे प्रकरण?
मायकेल वॉनने स्पार्क स्पोर्टशी बोलताना म्हंटले होते की, “केन विलियम्सन भारतीय असता तर तो जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला असता. मात्र, विराट कोहली भारतीय असल्याने त्याला असे म्हटले जाणार नाही. मला वाटते की केन विलियम्सन हा तिन्ही स्वरूपात सर्वोत्कृष्ट आहे. परंतु, विराट कोहलीसारखे १०० दशलक्ष इन्स्टाग्राम फॉलोअर्स नसल्याने तो मागे पडलेला दिसतो.” पण त्यांनतर सलमान बट्टने मायकेल वॉनच्या या विधानांचा खरपूस समाचार घेतला. बट्टने मायकेल वॉनच्या या विधानांना निरर्थक संबोधले होते. तसेच वॉनला गरज नसतांना वादग्रस्त विधाने करून वाद निर्माण करण्याची सवय आहे, असेही म्हंटले होते. इतकेच नाहीतर ‘ज्यांच्या नावावर एकही वनडे शतक नाही, त्यांनी ७० शतके नावे असलेल्या फलंदाजांबाबत बोलू नये’, असा टोलाही त्याने वॉनला लगावला होता.
मायकेल वॉनचे खमंग प्रत्युत्तर
सलमान बट्टने मारलेला टोला मायकेल वॉनच्या चांगलाच वर्मी लागल्याचे दिसून आले. त्यामुळे बट्टला प्रत्युत्तर देतांना वॉनने त्याला मॅच फिक्सिंग प्रकरणाची आठवण करून दिली. २०१० साली इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्या प्रकरणी सलमान बट्ट दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर बंदी देखील घालण्यात आली होती. याच प्रकरणाचा उल्लेख वॉनने केला. मायकेल वॉनने इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्ट करत आपला राग व्यक्त केला.
इंस्टाग्रामवर सलमानच्या विधानाचा संदर्भ देत तो म्हणाला, “सलमान, तू अगदी खरं बोललास. अगदीच खरं बोललास. पण एक गोष्ट सांगायची तू विसरलास, ती म्हणजे मी कधीही मॅच फिक्सिंग मध्ये सहभागी नव्हतो. काही व्यक्तींसारखा…”. मायकेल वॉनच्या या उपहासात्मक कमेंट मधून त्याला चांगल्याच मिरचा झोंबल्याचे लक्षात आले. ट्विटरवर देखील त्याने काहीशी याच अर्थाची पोस्ट केली.
https://www.instagram.com/p/CO7dTfsrtb4/?utm_source=ig_embed&ig_rid=4692d638-f17e-4c6e-8ab6-3fb40db5e197
No idea what the headline is … but I seen what Salman has said about me … that’s fine and he is allowed his opinion but I wished he had such a clear thought of mind back in 2010 when he was Match fixing !!! https://t.co/EkDWuH7Vi4
— Michael Vaughan (@MichaelVaughan) May 16, 2021
आता वॉनच्या या कमेंटवर सलमान बट्ट प्रत्युत्तर देणार का, आणि हा वाद अजून किती काळ रंगणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचा ‘हा’ गोलंदाज दुखापतीतून सावरला, पुन्हा केली सरावाला सुरुवात
या ५ खेळाडूंना मानले जाते सर्वाधिक आळशी क्रिकेटपटू; २ भारतीयांचाही समावेश