अँटिग्वा येथे सध्या वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात वेस्ट इंडीजचा तळातील फलंदाज मिगुएल कमिन्सने वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात 10 व्या क्रमांकावर येऊन 95 मिनिटे फलंदाजी केली. यावेळी त्याने 45 चेंडूंचाही सामना केला. मात्र या दरम्यान त्याला एकही धाव करता आली नाही. त्यामुळे त्याने दोन नकोसे विक्रम केले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ खेळपट्टीवर घालवूनही एकही धाव न करता बाद होण्याच्या यादीत कमिन्स दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू जॉफ एलोट आहेत. त्यांनी फेब्रुवारी 1999 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101 मिनिटे खेळपट्टीवर घालवली होती आणि त्यानंतर शून्यावर बाद झाले होते.
तसेच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आहे. त्याने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 81 मिनिटे खेळपट्टीवर टिकून फलंदाजी केली होती. पण तोही शून्य धावेवर बाद झाला होता.
त्याचबरोबर कमिन्स हा वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक चेंडू खेळल्यानंतर शून्यावर बाद होणारा क्रिकेटपटू देखील ठरला आहे. त्याने हा नकोसा विक्रम करताना किथ आर्थरटन यांचा विक्रम मागे टाकला आहे. आर्थरटन यांनी जून 1995 ला इंग्लंड विरुद्ध 40 चेंडूचा सामना केला होता. पण यानंतरही ते शून्यावर बाद झाले होते.
भारताविरुद्ध कमिन्सला रविंद्र जडेजाने त्रिफळाचीत केले. कमिन्सने या डावात वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरसह 9 व्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. पण या भागीदारीत त्याने एकाही धावेचे योगदान दिले नाही.
या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 297 धावा केल्या आहेत. तर वेस्ट इंडीजने पहिल्या डावात सर्वबाद 222 धावा केल्या आहेत. त्यामुळे वेस्ट इंडीजला 75 धावांची पिछाडी स्विकारावी लागली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात डावात 3 बाद 185 धावा केल्या आहेत.
#एका कसोटी डावामध्ये सर्वाधिक मिनिटे फलंदाजी केल्यानंतर शून्यावर बाद होणारे क्रिकेटपटू –
101 मिनिटे – जॉफ एलोट (न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 1999)
95 मिनिटे – मिगुएल कमिन्स (वेस्ट इंडीज विरुद्ध भारत, 2019)
81 मिनिटे – जेम्स अँडरसन (इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, 2014)
#वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक चेंडू खेळल्यानंतर शून्यावर बाद होणारे क्रिकेटपटू –
45 चेंडू – मिगुएल कमिन्स (विरुद्ध भारत, 2019)
40 चेंडू – किथ आर्थरटन (विरुद्ध इंग्लंड, 1995)
29 चेंडू – मार्विन दिल्लोन (विरुद्ध पाकिस्तान, 2002)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विंडीज विरुद्ध तिसऱ्या दिवशी काळी पट्टी बांधून मैदानात उतरला भारतीय संघ, जाणून घ्या कारण
–विंडीजविरुद्ध ५ विकेट्स घेणाऱ्या इशांत शर्माला बुमराहने दिला होता हा सल्ला
–कोहली-रहाणे जोडीने मोडला सचिन-गांगुलीच्या जोडीचा हा खास विश्वविक्रम