चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक माईक हसीने यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. कोरोनाला पराभूत करून हसी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असून सोमवारी तो ऑस्ट्रेलिया गाठण्याची शक्यता आहे. हसी रविवारी दोहा मार्गे ऑस्ट्रेलियाकडे मार्गस्थ झाला.
ऑस्ट्रेलियाच्या या माजी फलंदाजाचा आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल नकारात्मक आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये परतण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला. चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी के एस विश्वनाथन म्हणाले, हसी चार्टर्ड विमानाने दोहा येथे पोहोचला. तेथून तो ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.
हसीसह संदीप वॉरियर, वरूण चक्रवर्ती, अमित मिश्रा, टीम सिफर्ट व वृद्धिमान साहा हे खेळाडू तसेच इतर कर्मचारी बायो बबलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल २०२१ पुढे ढकलली. त्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी परत गेले. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह माईक हसीला एअर ऍम्ब्युलन्सद्वारे चेन्नईला पाठवण्यात आले. जेथे त्याच्यावर रूग्णालयात दीर्घकाळ उपचार सुरू होते.
आयपीएल २०२१ शी संबंधित ऑस्ट्रेलियाचे इतर खेळाडू मालदीवमध्ये क्वारंटाईन आहेत. सर्वजण तेथून ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. भारतातील कोरोनाची वाढती घटना पाहता ऑस्ट्रेलियन सरकारने सर्व भारतीय उड्डाणांवर १५ मे पर्यंत बंदी घातली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी परतण्याची समस्या निर्माण झाली होती. मात्र, बीसीसीआयच्या पुढाकारानंतर सर्व परदेशी खेळाडूंना चार्टर्ड प्लेनने घरी पाठवण्यात आले.
कोरोनामुळे स्थगित करावी लागली आयपीएल
आयपीएल २०२१ निम्मी पार पडल्यानंतर अचानकपणे काही खेळाडू व कर्मचारी कोरणा पॉझिटिव्ह आढळल्याने स्पर्धा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा खेळवण्यात येईल का याबाबत विचार सुरू आहे. सध्या बीसीसीआयपुढे श्रीलंका, इंग्लंड व यूएई असे तीन पर्याय आयपीएल आयोजनासाठी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर ‘अशी’ होती हैदराबादमधील संघ सहकाऱ्यांची प्रतिक्रिया
‘ही’ आहे भारतीय महिला संघाची ‘लेडी धोनी’, एकसारखीच आहे कहाणी