बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघ 184 धावांनी पराभूत झाल्यानंतर टीम इंडियासाठी काहीही चांगलं चाललेलं नाही. या पराभवानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्याच्या भारतीय संघाच्या आशांना मोठा धक्का बसला असून आता टीम इंडियाला अन्य संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. या दरम्यान संघात कर्णधाराबाबत मतभेद असल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, संघाच्या एका वरिष्ठ खेळाडूनं रोहित शर्मानंतर कर्णधारपद स्वीकारण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत.
‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, भारतीय संघात काही मतभेद असून एक वरिष्ठ खेळाडू अंतरिम कर्णधार म्हणून स्वत:ला ऑफर करण्यास तयार आहे. वास्तविक, रोहित शर्मा जेव्हा पर्थ कसोटीतून बाहेर होता, तेव्हा काही वरिष्ठ खेळाडूंचा त्याच्या कर्णधारापदाकडे डोळा होता. या वरिष्ठ खेळाडूची अंतरिम कर्णधार बनण्याची इच्छा आहे, जो स्वतःला ‘मिस्टर फिक्स-इट’ म्हणून सादर करतोय. या खेळाडूनुसार, संघातील तरुण खेळाडू अजून नेतृत्व करण्यास तयार नाहीत.
जसप्रीत बुमराह सध्या संघाचा उपकर्णधार असून पर्थमध्ये रोहितच्या अनुपस्थितीत त्यानं कर्णधाराची भूमिका बजावली आणि टीम इंडियाला विजयापर्यंत नेलं. विराट कोहलीनं आधीच कर्णधारपद सोडलं आहे. रोहितच्या करिअरबाबत संभ्रम आहे. अशा स्थितीत भारताकडे जसप्रीत बुमराहच्या रूपानं चांगला पर्याय आहे, ज्याला कर्णधारपद दिलं जाऊ शकतं.
जसप्रीत बुमराहनं पर्थ कसोटीपूर्वीही भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर मालिकेनंतर रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यास बुमराह त्याची जागा घेईल, अशी दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा अहवाल सूचित करतो की, संघात असं कोणीतरी आहे जो बुमराहच्या यशावर खूश नाही. मात्र, बुमराहची जागा कोणाला घ्यायची आहे याबाबत अहवालात कोणताही उल्लेख नाही.
भारतानं ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात विजयाने केली होती. मात्र त्यानंतर टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली. ॲडलेड आणि मेलबर्नमध्ये भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर झालेला कसोटी सामना पावसामुळे ड्रॉ झाला. मात्र, त्या सामन्यातही भारतीय संघाची स्थिती चांगली नव्हती. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
हेही वाचा –
भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! हेड कोच गौतम गंभीरबाबत रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
रिषभ पंत सिडनी कसोटीतून बाहेर होणार? पाचव्या कसोटीत बदलू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11
शेवटची कसोटी ड्राॅ राहिली, तर भारत WTCच्या फायनलमध्ये पोहोचणार का? कसं आहे समीकरण