सातव्या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांदरम्यान खेळला गेला. ऑस्ट्रेलियन संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत आपले पहिलेवहिले टी२० विश्वविजेतेपद पटकावले. डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १७३ धावांचे आव्हान सहजरित्या पार केले. या अंतिम सामन्याचा मानकरी ठरलेल्या अष्टपैलू मिचेल मार्शने अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. यासह त्याने या अंतिम सामन्यात एका लक्षवेधी विक्रमाला गवसणी घातली.
मार्शची मॅचविनिंग खेळी
न्यूझीलंडने दिलेल्या १७३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का कर्णधार ऍरॉन फिंचच्या रूपाने बसला. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिचेल मार्शने अखेरपर्यंत किल्ला लढवत ५० चेंडूंवर ६ चौकार व ४ षटकार ठोकत ७७ धावांची शानदार खेळी केली. ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोच्च खेळी ठरली.
हा विक्रम केला आपल्या नावे
मार्शने या सामन्यात ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. हे टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. विशेष म्हणजे याच सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ३२ चेंडूत अर्धशतक झळकावून हा विक्रम बनविला होता. यापूर्वी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने २०१४ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध व इंग्लंडच्या जो रूटने २०१६ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी ३३ चेंडूत अर्धशतके ठोकली होती.
ऑस्ट्रेलियाने पटकावले पहिले विजेतेपद
केवळ दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना जोश हेजलवूडच्या तीन बळींमूळे न्यूझीलंडचा डाव १७२ धावांवर रोखला. प्रत्युत्तरात, डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्शने शानदार अर्धशतके ठोकून संघाला ८ गड्यांनी संस्मरणीय विजय मिळवून दिला.