मेलबर्न | ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन निवृत्तीनंतर नैराश्यात होता. स्वत: जॉन्सनने या वस्तुस्थितीचा खुलासा केला आहे. त्याने 2018 मध्ये व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
निवृत्तीनंतर वाढले नैराश्य
निवृत्तीनंतरची परिस्थिती अधिक कठीण आहे का, असे जॉन्सनला विचारले गेले. त्यावर तो म्हणाला की, “हो, असं बरेच वेळा मला जाणवलं आहे की मी नैराश्यात आहे. माझा असा विश्वास आहे की नैराश्याचा संबंध तारुण्यापासूनच माझ्याबरोबर आहे.”
संपूर्ण कारकिर्दीत होते नैराश्य
ऑस्ट्रेलियातील चॅनेल 7 एसएएसशी बोलताना तो म्हणाला होता की, “माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला नैराश्याला सामोरे जावे लागले. वास्तविकता मी आता आयुष्यात चांगली वाटचाल करत आहे. मी खरोखर पुढे जात आहे. मी स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर मला काही दिवस अधिक अवघड गेले. अचानक तुमच्याकडे करण्यासाठी काही खास काम नसतं. तुम्ही उद्देशहीन झालेले असता. अशीच माझीही अवस्था झाली होती.”
कधीकधी माझा आत्मविश्वास असायचा कमी
जॉन्सनने कारकिर्दीत 73 कसोटी सामन्यांमध्ये 313 बळी घेतले. 2015 मध्ये तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला परंतु पुढील तीन वर्षे तो इंडियन प्रीमियर लीग आणि बिग बॅश लीगमध्ये खेळत राहिला. तो म्हणाला, “सामन्यादरम्यान कधीकधी माझा आत्मविश्वास खूप कमी असायचा.आता मी दोन वर्षांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मी आता स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा टप्प्यात आहे.”
अॅशेस मालिकेत केली उत्कृष्ट कामगिरी
वेगवान गोलंदाजीने भल्याभल्यांना हादरवणारा जॉन्सन 73 कसोटी सामन्यांमध्ये खेळला आहे. तेथे त्याने 313 बळी घेतले आहेत. 2013-14 च्या अॅशेस मालिकेत त्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजीही केली होती. त्या कामगिरीसाठी त्याची बरीच प्रशंसा झाली होती. त्या मालिकेत त्याने 13.97 च्या सरासरीने 37 बळी घेतले होते.
वनडे आणि टी20 कारकीर्द
जॉन्सनने 153 वनडे सामन्यात 25.26 च्या सरासरीने 239 बळी घेतले होते. 6 बाद 31 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 30 टी20 सामन्यात त्याने 38 बळी घेतले होते. 3 बाद 15 धावा ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.






