दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत विश्वविजेतेपदावर नाव कोरले. मात्र, असे असले तरी ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिशेल स्टार्कच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १७२ धावा केल्या. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सनने आक्रमक फलंदाजी करत दमदार अर्धशतक झळकावले. दरम्यान, मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर केन विलियम्सनने १२ चेंडूत ३९ धावा फटकावल्या. अकराव्या षटकात विल्यमसनने स्टार्कच्या गोलंदाजीवर सलग ३ चेंडूंवर ३ चौकार मारले आणि त्यानंतर न्यूझीलंड कर्णधाराने १६ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मिशेल स्टार्कच्या ६ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार ठोकला. या सामन्यात मिशेल स्टार्कच्या नावे एक निराशाजनक विक्रमाची नोंद झाली आहे.
टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महागडा गोलंदाज ठरण्याचा निराशाजनक विक्रम आता मिशेल स्टार्कच्या नावे झाला आहे. त्याने आपल्या चार षटकांत तब्बल ६० धावा दिल्या. हा विक्रम आधी लसिथ मलिंगाच्या नावे होता. त्याने २०१२ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेस्टइंडिजविरुद्ध खेळताना ५४ धावा दिल्या होत्या.
या यादीत तिसऱ्या स्थानी भारताचा माजी गोलंदाज एस श्रीसंत आहे. त्याने २००७ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळताना ४४ धावा दिल्या होत्या. श्रीसंतसोबत तिसऱ्या श्रीलंकेचा इसुरू उदाना देखील आहे. त्याने २००९ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळताना ४४ धावा दिल्या होत्या. चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन आहे. त्याने २०१० च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लडविरुद्ध खेळताना ४२ धावा दिल्या होत्या.
दरम्यान, सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने निर्धारित २० षटकात ४ गडी गमावून १७२ धावा केल्या. संघाकडून कर्णधार केन विल्यमसनने ४८ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय मार्टिन गप्टिलने २८ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने जबरदस्त गोलंदाजी करताना ४ षटकात १६ धावा देत ३ बळी घेतले. लेगस्पिनर ऍडम झाम्पाने २६ धावांत एक विकेट घेतली. या सामन्यात मिशेल स्टार्क चांगलाच महागडा ठरला. त्याने चार षटकांत ६० धावा दिल्या.
न्यूझीलंडच्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्शने वैयक्तिक अर्धशतके झळकावताना दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. वॉर्नरने ३८ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. तसेच मार्शने ५० चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेल २८ धावांवर नाबाद राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
मॅचविनिंग खेळीसह मार्शने बनवला विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वात मोठा विक्रम; दिग्गजांना सोडले मागे
‘बिग फायनल’मध्ये हेजलवूडने दाखवला ‘जोश’; इरफानच्या ‘त्या’ विक्रमाची केली बरोबरी