दिग्गज भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजला यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. एवढेच नाही, तर भारताचा सलामीवीर शिखर धवन याला देखील अर्जून पुरस्कार मिळणार आहे. यावर्षी जून महिन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुरस्कारासाठी मिताली, शिखर आणि आर अश्विन यांच्या नावाची शिफारस केली होती.
खेलरत्न हा भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. यंदा हा पुरस्कार मितालीला जाहीर झाला असल्याने ती हा पुरस्कार जिंकणारी भारताची पाचवी क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मिताली गेली २२ वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तिने १९९९ साली भारताकडून पदार्पण केले होते. आज ती जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणली जाते.
तिने आत्तापर्यंत १२ कसोटी सामने, २२० वनडे आणि ८९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तिने कसोटीत ६९९ धावा, वनडेत ७३९१ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये २३६४ धावा केल्या आहेत. तिने वनडेत सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू आहे. मितालीला यापूर्वी पद्मश्री आणि अर्जून पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
शिखर धवनचाही होणार सन्मान
शिखरचे नाव यंदा अर्जून पुरस्कार विजेत्या खेळाडूंमध्ये आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिखर भारतीय संघाकडून मोलाची कामगिरी बजावत आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४७ सामने खेळले आहेत. त्याने १० हजारांहून अधिक धावा केल्या असून २४ शतकं केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
माजी ऑसी यष्टीरक्षकाने सांगितली टी२० विश्वचषकातील भारतीय संघाची सर्वात मोठी कमजोरी
अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला