भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी (22 सप्टेंबर) मोहालीमध्ये खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने शानदार फलंदाजी करत 276 पर्यंत मजल मारली. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया संघाला रोखण्याचे काम एकट्या मोहम्मद शमी याने केले. त्याने आपल्या दहा षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत पाठवला.
आशिया चषकातील अनेक महत्त्वाच्या सामन्यात विश्रांती दिल्यानंतर शमी याने या सामन्यात पुनरागमन करताना शानदार कामगिरी करून दाखवली. त्याने पहिल्याच षटकात मिचेल मार्शला तंबूत पाठवले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ याला देखील बाद केले. तर आपल्या अखेरच्या स्पेलमध्ये मार्कस स्टॉयनिस, सीन ऍबॉट व मॅट शॉर्ट यांना बाद केले. त्याने आपल्या 10 षटकांमध्ये 51 धावा खर्च करून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पाच बळी मिळवणारा तो भारताचा केवळ तिसरा गोलंदाज बनला. यापूर्वी कपिल देव व अजित आगरकर यांनी अशी कामगिरी केली होती. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला.
ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात सलामीवीर डेविड वॉर्नर याने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. वॉर्नरव्यतिरिक्त स्टीव स्मिथ (41), मार्नस लॅब्युशेन (39) आणि जोस इंग्लिस (45) यांनी महत्वाचे योगदान दिले. कर्णधार कमिन्स याने अखेरच्या टप्प्यात काही मोठे फटके खेळत संघाची धावसंख्या 276 पर्यंत नेली. भारतासाठी शमीव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
Mohamad Shami Tooks Fiffer Against Australia In Mohali ODI