भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या वनडे मालिकेतील पहिला सामना कोलंबो येथे खेळला गेला. किंबहुना तुमच्या लक्षात आलं नसेल, मात्र भारत आणि श्रीलंकेच्या संघात एकाच नावाचे दोन खेळाडू खेळत आहेत. टीम इंडियाकडे मोहम्मद सिराज आहे, जो श्रीलंकेविरुद्ध त्याच्या धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तर दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघात मोहम्मद शिराज आहे. त्यांच्या नावाचं स्पेलिंग जरी वेगळं असलं तरी दोघांच्याही नावांचा उच्चार सारखाच आहे.
मोहम्मद शिराज हा 29 वर्षीय वेगवान गोलंदाज असून त्यानं भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मोहम्मद सिराज प्रमाणे तो देखील उजव्या हातानं वेगवान गोलंदाजी करतो. सिराजनं 2019 मध्ये भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्यानं 68 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, श्रीलंकेचा मोहम्मद शिराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळेच त्याला भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानानं दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली. त्यामुळे त्याच्या जागी मोहम्मद शिराजला श्रीलंकेच्या संघात स्थान देण्यात आलंय. शिराजनं अधिकृत पदार्पण आज झालं असलं तरी त्याला 5 वर्षांपूर्वीच श्रीलंकेच्या संघात संधी मिळाली होती.
मोहम्मद शिराजला 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेच्या 15 सदस्यीय संघात स्थान मिळालं होतं. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. शिराजनं 49 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 125 विकेट घेण्यासोबतच 383 धावा केल्या आहेत. लिस्ट-ए कारकिर्दीतील त्याचा गोलंदाजीचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्यानं लिस्ट-ए मध्ये 47 सामन्यांत 80 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा –
रोहित-विराट शाळेत होते, तर गिलचा जन्मही झाला नव्हता! श्रीलंकेनं कधी जिंकली होती भारताविरुद्ध शेवटची वनडे मालिका?
राहुल द्रविड बनतील इंग्लंडचे नवे मुख्य प्रशिक्षक? विश्वचषक विजेत्या कर्णधाराचं वक्तव्य चर्चेत
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राडा! ट्रान्सजेंडर बॉक्सरनं महिला बॉक्सरला अवघ्या 46 सेकंदात दिला धोबीपछाड