---Advertisement---

जेव्हा २०वर्षांपूर्वी मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकला होता वर्ल्डकप

On: मंगळवार, जानेवारी 28, 2020 6:34 PM
---Advertisement---

सध्या दक्षिण आफ्रिकेत (South Africa) येथे 19 वर्षाखालील विश्वचषक (Under-19 World Cup) स्पर्धा सुरु आहे. यामध्ये भारत उपांत्यपूर्व (Quarter Final) फेरीत पोहोचला आहे. या उपांत्यपूर्व फेरीचा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात खेळला जात आहे.

आत्तापर्यंत भारताने 2000, 2008, 2012 आणि 2018 अशी चार 19 वर्षाखालील विश्वचषक विजेतेपदे पटकावली आहेत. 19 वर्षांखालील विश्वचषक भारताने पहिल्यांदा 2000 साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली जिंकला. आज(28 जानेवारी) या विश्वचषक विजेतेपदाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या विश्वचषकानंतर कैफने वरिष्ठ भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही केले.

20 वर्षांपूर्वी जिंकलेल्या या 19 वर्षांखालील विश्वचषकाबद्दल भारताचा माजी फलंदाज आणि 19 वर्षाखालील विश्वचषक विजेता कर्णधार मोहम्मद कैफने ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या विश्वचषकासाठी सध्याच्या 19 वर्षाखालील भारतीय संघाला शुभेच्छाही दिल्या आहेत.

“आम्ही पहिल्यांदा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकलो होतो. त्या विजयाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. कर्णधार म्हणून माझ्यासाठी ही अभिमानाची बाब होती, की मी या विश्वविजेत्या संघाचे नेतृत्व केले आहे. मी 19 वर्षाखालील भारतीय संघाला शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की संघ आपले विजेतेपद कायम राखेल,” असे खास ट्विट कैफने आज केले आहे.

2000च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात कैफ बरोबरच युवराज सिंग, वेणूगोपाल राव, अजय रात्रा असे खेळाडूही खेळले. ज्यांनी पुढे जाऊन वरिष्ठ भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व केले.

असा झाला होता 19 वर्षांखालील विश्वचषक 2000चा अंतिम सामना-

28 जानेवारी 2000 मध्ये कोलंबो येथे 19 वर्षाखालील विश्वचषकातील अंतिम सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला. यामध्ये श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

यावेळी श्रीलंकेला भारताने 48.1 षटकात 178 धावांवर सर्वबाद केले. यावेळी श्रीलंकेकडून फलंदाजी करताना जेहान मुबारकने 108 चेंडूत सर्वाधिक 58 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. यामध्ये 5 चौकारांचा समावेश होता.

यानंतर 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 40.4 षटकात 4 बाद 180 धावा करत 19 वर्षाखालील विश्वचषकाचे विजेतेपद पटकाविले. यामध्ये भारताकडून फलंदाजी करताना रितिंदर सिंग सोढीने नाबाद सर्वाधिक 39 धावा केल्या. तर नीरज पटेलने नाबाद 34 धावा केल्या. तसेच युवराज सिंग आणि मनीष शर्माने प्रत्येकी 27 धावा केल्या.

यावेळी रितिंदर सिंग सोढीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तर, युवराजला मालिकावीर म्हणून सम्मानित केले होते.

या विश्वचषकानंतर आतापर्यंत भारताने तब्बल 4 वेळा विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे.

आत्तापर्यंत मोहम्मद कैफ (2000), विराट कोहली (2008), उन्मुक्त चंद (2012) आणि पृथ्वी शाॅ (2018) या खेळाडूंच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 19 वर्षाखालील विश्वचषकाचे विजेतेपदे मिळवले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---