भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं 2024 टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडला आहे. आगामी टी20 विश्वचषक स्पर्धा जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. भारतीय संघ 5 जून रोजी स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. मोहम्मद कैफनं 15 खेळाडूंच्या संघात विस्फोटक फलंदाज रिंकू सिंहचा समावेश केला नाही. याशिवाय शुबमन गिल आणि संजू सॅमसन यांनाही कैफच्या टीममध्ये स्थान मिळालेलं नाही.
स्टार स्पोर्ट्सचा शो ‘फॉलो द ब्लूज’मध्ये कैफ म्हणाला, “यशस्वी जयस्वाल कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंग करेल. त्यानंतर विराट कोहली येईल. सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर असेल. अष्टपैलू हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर असेल.”
कैफ पुढे म्हणाला, “मी संघात एकापेक्षा जास्त अष्टपैलू खेळाडूंना ठेवीन कारण तुम्हाला फलंदाजीत सखोलता हवी आहे. त्यामुळे सातव्या क्रमांकावर अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा आठव्या क्रमांकावर येईल. त्यांच्यानंतर 9व्या क्रमांकावर कुलदीप यादव आहे. त्यानंतर दोन वेगवान गोलंदाज असतील – जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.”
मोहम्मद कैफनं संघात फिरकीपटू आर अश्विनच्या ऐवजी युजवेंद्र चहलला प्राधान्य दिलंय. तो म्हणाला, “मी संघाबद्दल बोललो तर मला वाटतं फिरकीपटू म्हणून चहलला ठेवावं लागेल. तो लेग स्पिनर आहे. अश्विन गेल्या विश्वचषकात टीममध्ये होता. मात्र त्यानं यावेळी आयपीएल 2024 मध्ये जास्त विकेट घेतलेल्या नाही. माझा विश्वास आहे की, जेथे चेंडूला वळण मिळतं, अशा परिस्थितीत चहल खूप चांगला गोलंदाज आहे.”
मोहम्मद कैफ पुढे म्हणाला की, “मी संघात शिवम दुबेची निवड करेन. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून फिरकीही उत्कृष्ट खेळतो. मी रियान परागला संघात घेईन. तो चांगला खेळत आहे आणि संघात येण्यास पात्र आहे. याशिवाय, मी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा संघात समावेश करू इच्छितो. तो फॉर्ममध्ये नाही पण तो एक अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे”. जितेश शर्मा, केएल राहुल आणि आवेश खान यांनी राखीव खेळाडू म्हणून संघासोबत जावं, असं कैफ शेवटी म्हणाला.
टी-20 विश्वचषक 2024 साठी मोहम्मद कैफचा भारतीय संघ – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, शिवम दुबे, रियान पराग, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू – जितेश शर्मा, केएल राहुल आणि आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या-
गुणतालिकेत तळाशी असलेली आरसीबी अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकते का? जाणून घ्या
मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यापूर्वी एकत्र दिसले सचिन, धोनी आणि रोहित! नक्की काय शिजतंय?