क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यात वयाची कोणतीही मर्यादा नसते. खेळाडू आपल्या फिटनेसनुसार कितीही वर्ष हा खेळू शकतात. तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा दोन भावांना एकत्र खेळताना पाहिलं असेल. मात्र आता जे घडलं, ते फारच वेगळं आहे.
अफगाणिस्तानमध्ये आयोजित शापगिझा क्रिकेट लीगमध्ये एक अनोखी घटना घडली. या लीगमध्ये जगातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी भाग घेत आहे. गुरुवारी (22 ऑगस्ट) झालेल्या सामन्यात नबी चक्क त्याचा मुलगा हसन ऐसाखिल विरुद्ध खेळला! पिता-पुत्रांनी क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांविरुद्ध खेळण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ आहे.
22 ऑगस्ट रोजी मिस ऐनक नाईट्स आणि स्पीन घर टायगर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात 39 वर्षीय मोहम्मद नबी नाइट्स संघाकडून खेळत होता. त्याचवेळी त्याचा मुलगा 18 वर्षीय हसन ऐसाखिल टायगर्स संघाकडून खेळला. या पिता-पुत्रांचा मैदानावरील एकत्र फोटो समोर आला आहे, जो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय.
या सामन्यात हसन ऐसाखिलच्या संघानं 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. मात्र सामन्यात मोहम्मद नबी आणि हसन ऐसाखिल हे दोघंही काही विशेष कामगिरी करू शकले नाही. नाइट्सकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना नबी आपलं खातंही उघडू शकला नाही. तर दुसरीकडे दुसऱ्या डावात सलामीवीर हसन ऐसाखिल अवघ्या 10 धावा करून क्लीन बोल्ड झाला.
हसन ऐसाखिल हा आयसीसी अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड 2024 मध्ये अफगाणिस्तान संघाचा सदस्य होता. मात्र, संघ आपले तीनही साखळी सामने गमावून स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेरीतूनच बाहेर पडला. दुसरीकडे, मोहम्मद नबी दीर्घकाळापासून अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा भाग आहे. 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या नबीनं त्याच्या कारकिर्दीत एकूण 161 एकदिवसीय, 129 टी20 आणि 3 कसोटी सामने खेळले आहेत.
हेही वाचा –
147 वर्षांच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं! आशिया खंडाबाहेर श्रीलंकेच्या गोलंदाजांचा पराक्रम
‘एमएस धोनी सारखे आयुष्य जगायचे आहे..’, पुरस्कार सोहळ्यात कर्णधाराने व्यक्त केल्या भावना
तिसरी पत्नी सना जावेदसोबत स्वित्झर्लंडला पोहोचला शोएब मलिक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल