इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 236 धावांत गारद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं 6 बाद 259 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडे सध्या 23 धावांची आघाडी आहे.
या सामन्यात श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी एक मोठा इतिहास रचला. 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात जे कधीही घडलं नव्हतं, ते या सामन्यात पाहायला मिळालं. श्रीलंकेच्या धनंजय डी सिल्वा आणि प्रभात जयसूर्या यांनी मिळून हा पराक्रम केला आहे. हा असा पराक्रम आहे, जो आशियाबाहेर एकाही फिरकी जोडीनं यापूर्वी केला नव्हता.
इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर सहसा वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं. परंतु या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वा यानं एक आश्चर्यकारक निर्णय घेतला. त्यानं फिरकीपटूंसह गोलंदाजीची सुरुवात केली, जे पाहून इंग्लिश फलंदाजही हैराण झाले होते.
वास्तविक, या सामन्यावर पावसाचं सावट होतं. अशा स्थितीत पंचांना सामना लवकरात लवकर थांबवायचा होता. मात्र श्रीलंकेचा कर्णधार धनंजय वेळ सतत पुढे ढकलत होता. गडद ढगांमुळे सूर्यप्रकाश कमी झाला. अशा स्थितीत श्रीलंकेच्या संघानं वेगवान गोलंदाजांऐवजी फिरकीपटूंसह गोलंदाजीला सुरुवात केली.
इंग्लंडच्या डावातील पहिलं आणि दुसरं षटक श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी टाकलं. कर्णधार धनंजयनं स्वतः पहिलं षटक टाकलं. इंग्लंडच्या फलंदाजासाठी हा मोठा धक्का होता. मात्र तो एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं दुसर षटक फिरकीपटू प्रभात जयसूर्याला दिलं. मँचेस्टरच्या ढगाळ वातावरणात डावाची सुरुवात दोन फिरकीपटूंनी केली, ही घटना धक्कादायक आहे. कसोटी इतिहासात आशियाबाहेरील देशात दोन फिरकीपटूंनी डावाची पहिली दोन षटकं टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हेही वाचा –
‘एमएस धोनी सारखे आयुष्य जगायचे आहे..’, पुरस्कार सोहळ्यात कर्णधाराने व्यक्त केल्या भावना
तिसरी पत्नी सना जावेदसोबत स्वित्झर्लंडला पोहोचला शोएब मलिक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
नीरज चोप्राची मोठी झेप, ब्रॅन्ड व्हॅल्यूच्या बाबतीत हार्दिक पांड्याला मागे टाकलं; आता नंबर रोहितचा!






