आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये न्यूझीलंडने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. गट २ मधील या सर्वात महत्त्वाच्या सामन्यात तीन संघांच्या भवितव्याचा फैसला होणार होता आणि न्यूझीलंडने हा सामना सहज जिंकून भारत आणि अफगाणिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या सर्व आशा संपुष्टात आणल्या. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत केवळ १२४ धावा करू शकला. अफगाणिस्तानचे आव्हान न्यूझीलंडने १९ व्या षटकात केवळ २ विकेट गमावून सहज पार केले. सामन्यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी म्हणाला की, आम्ही पूर्ण प्रयत्न केले पण यश आले नाही. विशेष म्हणजे अफगाणिस्तानचा पराभव करून न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
नबीने म्हटले की, “नाणेफेक जिंकून चांगली धावसंख्या करायची आमची योजना होती. पण आमची सुरुवात चांगली झाली नाही. त्यानंतर नजीबने आम्हाला सामन्यात परत आणण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, आम्ही परत आलो नाही. या खेळपट्टीवर आम्ही ३० धावांनी मागे होतो. आमची नजर १५०-१६० वर होती, विजय प्राप्त करण्यासाठी ती धावसंख्या पुरेशी ठरली असती. आमची गोलंदाजी मजबूत आहे. पण आम्हाला चांगली धावसंख्या करता आली नाही.”
नबी पुढे म्हणाला की, या”सामन्यात आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरच चांगली गोलंदाजी केली. आम्हाला यूएईमध्ये खेळण्याचा खूप अनुभव आहे, आम्ही या स्पर्धेतून अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन जात आहोत.”
अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंड संघाने नवीन चेंडूवर चांगली गोलंदाजी करत तीन गडी लवकर बाद केले. त्यामुळे अफगाणिस्तानवरही दबाव वाढला. नजीबुल्लाने ७३ धावा केल्या. मात्र, इतर फलंदाज अपयशी ठरले. इथून हा सामना न्यूझीलंडसाठी सोपा झाला. अफगाणिस्तान संघाने प्रथम खेळताना १२४ धावांची माफक धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडने दोन गडी गमावून सहज विजय मिळवला.
या विजयासह न्यूझीलंडने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. त्याचवेळी भारतीय संघाच्या सर्व शक्यता संपुष्टात आल्या होत्या. भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारतीय संघाला आता आपला उर्वरित सामना नामिबियाविरुद्ध खेळायचा आहे.