पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारी (११ नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२१ चा दुसरा उपांत्य फेरी सामना पार पडला. संपूर्ण टी२० विश्वचषकात अजेय राहिलेल्या पाकिस्तान संघाला हा महत्त्वपूर्ण सामना जिंकण्यात मात्र अपयश आले. ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस यांच्या झंझावातापुढे पाकिस्तानचा संघ नेस्तनाबूत झाला. ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याने अर्धशतक ठोकले. यासह एक मोठा किर्तीमान त्याच्या नावावर झाला आहे.
यष्टीरक्षक फलंदाज रिझवान त्याने या सामन्यात ५२ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ६७ धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने ४ षटकार आणि ३ चौकार मारले. या खेळीसह रिझवानने इतिहास रचला आहे. त्याने २०२१ वर्षातील आपल्या टी२० क्रिकेटमधील १००० धावांचा पल्ला गाठला गाठला आहे. यासह रिझवान टी२० क्रिकेटमध्ये एका वर्षात १००० धावा करणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू बनला आहे.
रिझवानने यंदाच्या वर्षी २३ टी२० सामने खेळताना त्यातील २० डावांमध्ये फलंदाजी केली आहे. यादरम्यान ८६.०८ च्या सरासरीने फलंदाजी करताना १० अर्धशतक आणि एका शतकाच्या साहाय्याने त्याने १०३३ धावा केल्या आहेत.
त्याच्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सर्वाधिक ८२६ धावांसह या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने २०२१ मध्येच या धावा चोपल्या आहेत. या पाकिस्तानी फलंदाजांनंतर आयर्लंडचे पॉल स्टर्लिंग (७४८ धावा, २०१९) आणि केविन ओ ब्रायन (७२९ धावा, २०१९) आणि डच क्रिकेटपटू मॅक्स ओ डाओड (७०२ धावा, २०१९) पहिल्या ५ स्थानांवर आहेत.
याव्यतिरिक्त रिझवान हा क्रिकेटच्या एका स्वरुपात एका वर्षात पहिलेवहिले एक हजारी मनसबदार बनलेल्या दिग्गजांच्या मांदियाळीतही सहभागी झाला आहे. कसोटी स्वरुपात सर्वप्रथम क्लेम हिलने (१०६० धावा) एका वर्षात १००० धावा केल्या होत्या. १९०२ साली त्यांनी हा पराक्रम केला होता. वनडे क्रिकेटमध्ये १९८३ मध्ये डेविड गोवर यांनी हा किर्तीमान केला होता. त्यांनी त्यावर्षी १०८६ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर रिझवान टी२० क्रिकेटमध्ये हा भीमपराक्रम करणारा पहिला क्रिकेटपटू बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो’ मॅच विनिंग झेल सोडणाऱ्या हसन अलीचेही भर मैदानात पाणावले डोळे, पाहा तो भावनिक क्षण
न्यूझीलंड संघाला मोठा धक्का, ‘हा’ मॅच विनर खेळाडू टी२० विश्वचषक फायनलसहित भारत दौऱ्यातूनही बाहेर
ड्रमला लक्ष्य करून शिकला गोलंदाजी; कारकिर्दीत ९४९ विकेट्स घेणाऱ्या ‘या’ खेळाडूने सचिनलाही फोडला घाम