येत्या एप्रिल महिन्यापासून भारतात आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार आहे. आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक संघांनी सरावाला देखील सुरुवात केली आहे. अशातच पंजाब किंग्स संघासाठी आनंदाची बातमी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापतीमुळे बाहेर झालेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल स्पर्धेसाठी उपलब्ध असणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. याच मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला फलंदाजी करताना चेंडू लागला होता. यामुळे तो मालिकेतून बाहेर देखील झाला होता.
त्यानंतर तो बंगळुरुमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर लक्ष देत होता. त्याचमुळे त्याला मायदेशात इंग्लंडविरुद्ध झालेल्या क्रिकेट मालिकांनाही मुकावे लागले होते. पण आता ९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेतून तो मैदानात पुनरागमन करणार आहे. तो या स्पर्धेत पंजाब किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
मी पूर्णपणे फिट – शमी
आयपीएल स्पर्धेतून व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत शमी म्हणाला, “मी पूर्णपणे फिट आहे आणि खेळण्यासाठी तयार आहे. फलंदाजी करताना दुखापतग्रस्त होणे हे दुर्दैवी होते. कारण बर्याच काळापासून माझ्यासोबत फिटनेस संबंधी काहीच घडले नव्हते. परंतु, त्यात मी काहीही करू शकलो नाही. हा खेळाचा एक भाग आहे. मी नेहमीच सकारात्मक बाबींकडे पहातो. मागील हंगाम माझ्यासाठी चांगला होता आणि आशा आहे की या वेळीही मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करेल. दुखापतीमुळे मला आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळाला.”
शमीने आयपीएल २०२० मध्ये एकूण १४ सामने खेळले होते. यात त्याला २० गडी बाद करण्यात यश आले होते. त्यामुळे पंजाब किंग्स संघाच्या चाहत्यांना यंदादेखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! रोड सेफ्टी सिरीज नडली? सचिनचा युसूफ, बद्रीनाथपाठोपाठ तिसरा संघसहकारी कोरोना पाॅझिटीव्ह
मंडळी राहुल द्रविडला मराठीत बोलताना ऐकलंय का? नसेल तर पाहा ‘हा’ व्हिडीओ






