माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी ३९ वर्षांपुर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत धुमाकूळ घातला होता. आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्यांनी शतकी खेळी तर केली होतीच सोबतच पुढील २ सामन्यातही त्यांनी शतक झळकावले होते. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताच सलग तीन कसोटी सामन्यात शतकांची हॅट्रिक करण्याचा विश्वविक्रम त्यांनी आपल्या नावे केला होता. १ फेब्रुवारी १९८५ रोजी त्यांनी या शानदार विश्वविक्रमाची कसोटी इतिहासात नोंद केली आहे आणि आजही हा विक्रम अभेद्य आहे. या विक्रमाची नोंद करणाऱ्या अझरुद्दीन यांचा आज (८ फेब्रुवारी) वाढदिवस आहे.
अशी झाली भारतीय संघात एन्ट्री
इंग्लंडचा संघ १९८४-८५ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या सामन्यात खराब प्रदर्शन केलेल्या कपिल देव आणि संदीप पाटील यांना पुढील तिसऱ्या सामन्यातून डच्चू देऊन एका २१ वर्षीय मुलाला संधी देण्यात आली होती. हा मुलगा अजून कोणी नसून मोहम्मद अझरुद्दीन होते.
सलग तीन कसोटी सामन्यात केली शतकी कामगिरी
३१ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना झाला होता. या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत अझरुद्दीन यांनी झुंजार शतकी खेळी केली होती. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३२२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने त्यांनी ११० धावा करत शतक ठोकले होते.
त्यानंतर मद्रास (आता चेन्नई) येथे अझरुद्दीन यांनी दुसरा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यातही त्यांनी १०५ धावांची अफलातून खेळी केली होती. तर पुढील कानपुर येथे झालेल्या कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात त्यांनी १२२ धावा चोपल्या होत्या. अशाप्रकारे कसोटी कारकिर्दीतील पहिल्या ३ सामन्यात सलग ३ शतक जडणारे ते क्रिकेटजगतातील पहिले आणि एकमेव फलंदाज ठरले आहेत.
३९ वर्षांत कुणीही मोडला नाही विश्वविक्रम
महत्त्वाची बाब अशी की, अझरुद्दीन यांच्यानंतर बरेच फलंदाज या विश्वविक्रमाच्या जवळ पोहोचले. परंतु कोणत्याही फलंदाजाला सलग २ शतकांच्या वर जाता आले नाही. माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांचाही यात क्रमांक लागतो. तसेच भारताचा विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा यानेही कसोटी पदार्पणाच्या आणि त्यापुढील सामन्यात शतक केले होते. परंतु हॅट्रिक करण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे गेल्या ३९ वर्षांपासून अझरुद्दीन यांचा हा विश्वविक्रम कायम आहे.
कसोटी पदार्पण करत सलग २ किंवा ३ शतक करणारे फलंदाज
३ शतके- मोहम्मद अझरुद्दीन (भारत, १९८४-८५)
२ शतके- बिल पॉन्सफोर्ड (ऑस्ट्रेलिया, १९२४-२५), डग वॉल्टर्स (ऑस्ट्रेलिया, १९६५), एल्विन कालिचरण (वेस्ट इंडिज, १९७२), ग्रेग ब्लेवेट (ऑस्ट्रेलिया, १९९५), सौरव गांगुली (भारत, १९९६), रोहित शर्मा (भारत, २०१३), जिमी नीशम (न्यूझीलंड, २०१४), आबिद अली (पाकिस्तान, २०१९)
वाचा-
सिंधुदुर्ग ते लंडन व्हाया मुंबई असा प्रवास करणारी पूनम राऊत
भारताला भारतात पराभूत केलेल्या इंग्लंडचे ‘हे’ ३ खेळाडू, जे आजही खेळत आहेत कसोटी क्रिकेट
मराठीत माहिती- क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन