स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताकडून केवळ वनडे प्रकारचे आंतरराष्ट्रीय सामने खेळतात. त्यामुळे त्यांच्या या क्रिकेट प्रकारातील भविष्याबाबतही आता चर्चा वाढल्या आहेत. दोघांना भारताच्या दिग्गजाने पाठिंबा दर्शविला असून त्यांचा अनुभव 2027 च्या विश्वचषकात विरोधी संघांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो, असे वक्तव्य केले आहे.
मोहम्मद कैफने रोहित आणि विराट यांची तुलना अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीशी केली आहे. त्याने म्हटले की, ज्याप्रमाणे अर्जेंटिना मेस्सीच्या अनुभवाच्या जोरावर 2026 च्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला, त्याचप्रमाणे रोहित आणि विराट 2027 च्या विश्वचषकात भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध मेस्सीने एकही गोल केला नाही, मात्र त्याच्या दोन उत्कृष्ठ असिस्टमुळे अर्जेंटिनाला दोन गोल करता आले. या सामन्यात अर्जेंटिनाने शेवटच्या काही मिनिटांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आणि बाजी पलटवली. त्यांनी इंग्लंडला 2-1 असे पराभूत करत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.
कैफने एका कार्यक्रमामध्ये म्हटले, “2027 चा टप्पा खूप महत्त्वाचा असेल. लोक रोहित आणि विराटबद्दल चर्चा करत आहे, कारण तो विश्वचषक सोपा नसेल. तेथिल परिस्थिती वेगळी, खेळपट्ट्या उसळणाऱ्या आणि भारताला तिथे या दोन्ही खेळाडूंची गरज भासेल. त्यांनी आतापासून शक्य तितके सामने खेळावे आणि चांगल्या फॉर्ममध्ये राहावे, अशीच इच्छा आहे.”
“मेस्सी 39 वर्षांचा आहे आणि त्याचा संघ फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याने उपांत्य फेरीत गोल केला नसला, तरी असिस्ट मात्र केले. अनुभवामुळेच हे घडते. जेव्हा तुमच्याकडे काम फत्ते करू शकणारे तरूण खेळाडू असतात, तेव्हा अनुभवी खेळाडूंना त्यांना मार्गदर्शन कसे करायचे आणि संधी कशा निर्माण करायच्या हे माहित असते. त्यामुळे अर्जेंटिनासाठी मेस्सी जसा आहे, तसेच विश्वचषकात विराट आणि रोहित भारतासाठी आहेत,” असे कैफने पुढे स्पष्ट केले.
“खेळ कोणताही असो, अनुभव खूप मोठी भूमिका बजावतो. विराट आणि रोहित यांची गणना आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ठ एकदिवसीय खेळाडूंमध्ये केली जाते, त्यामुळे भारताला त्यांची 100% कामगिरी आवश्यक असेल,” असेही कैफने पुढे म्हटले आहे.
कैफचे वक्तव्य रोहितच्या निवृत्तीच्या अफवांनंतर आले आहे. या अफवांना बीसीसीआयने चुकीचे ठरवले असून रोहित इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यानंतर निवृत्त होणार नाही, हे स्पष्ट केले आहे.
सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. ही मालिका 1-1 अशी बरोबरीत असून शेवटचा मालिका निर्णायक सामना रविवारी (19 जुलै) खेळला जाणार आहे. (Mohammed Kaif says just like Lionel Messi for Argentina same Rohit Sharma & Virat Kohli are essential for Team India in 2027 World Cup)






