वेस्ट इंडीजचे दिग्गज क्रिकेटपटू आणि या खेळाच्या इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या सर गारफील्ड (गॅरी) सोबर्स यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89व्या वर्षी बार्बाडोस येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘क्रिकेट वेस्ट इंडीज’ने सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.
आपल्या संदेशात ‘क्रिकेट वेस्ट इंडीज’ने म्हटले आहे, “एका महान खेळीचा (इनिंग्जचा) आज शेवट झाला आहे. सर गारफील्ड सोबर्स – आमच्या हृदयात, आज आणि सदैव.”
1954 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
28 जुलै 1936 रोजी बार्बाडोसच्या ब्रिजटाउन येथे जन्मलेल्या सोबर्स यांनी 1954 मध्ये किंग्स्टन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ते डावखुरे फलंदाज तसेच ‘लेफ्ट-आर्म ऑर्थोडॉक्स’ आणि ‘रिस्ट-स्पिन’ गोलंदाज होते.
1954 ते 1974 या काळात ते वेस्ट इंडीज क्रिकेटमधील सर्वात विश्वसनीय आणि प्रभावी खेळाडूंपैकी एक राहिले.
सर गारफील्ड सोबर्स यांनी 93 कसोटी सामन्यांच्या 160 डावांमध्ये 8032 धावा केल्या. ज्यात त्यांनी 26 शतके आणि 30 अर्धशतके झळकावली, शिवाय 365* धावांची सर्वोच्च खेळी समाविष्ट होती. गोलंदाज म्हणून त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 235 विकेट्स घेतले. त्यांनी वेस्ट इंडीजसाठी एक वन डे इंटरनॅशनल सामनाही खेळला, ज्यामध्ये त्यांनी एक बळी घेतला.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारणारे पहिले फलंदाज
सोबर्स यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात प्रामुख्याने गोलंदाज म्हणून केली होती. वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी आपले पहिले कसोटी शतक झळकावले. त्यानंतर, 1958 मध्ये सबिना पार्क येथे पाकिस्तानविरुद्ध 365* धावांची ऐतिहासिक खेळी करत त्यांनी लेन हटन यांचा कसोटीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडला. हा विक्रम नंतर 1994 मध्ये ब्रायन लारा यांनी मोडला.
याव्यतिरिक्त, नॉटिंगहॅमशायरकडून खेळताना, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सलग सहा षटकार मारणारे ते पहिले फलंदाज ठरले; ही कामगिरी त्यांनी ग्लॅमॉर्गनच्या माल्कम नॅशविरुद्ध केली होती.
सर गारफिल्ड सोबर्स यांनी वयाच्या 21 वर्षे आणि 213 दिवस इतक्या कमी वयात पाकिस्तानविरुद्ध कसोटी त्रिशतक झळकावून इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारे सर्वात तरुण फलंदाज म्हणून त्यांचा विक्रम आजही कायम आहे. हा विक्रम करताना त्यांनी महान डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकले.
पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरीसाठी दिला जाणारा आयसीसीचा (ICC) सर्वोच्च वार्षिक सन्मान असलेला ‘सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार’ त्यांच्या सन्मानार्थ प्रदान केला जातो.
क्रिकेटमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना 1975 मध्ये प्रतिष्ठित ‘नाइटहूड’ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाने एका महान अष्टपैलू खेळाडूला कायमचे गमावले आहे.






