क्रिकेट आणि विक्रम या जोडगोळीला कोणीच वेगळे करू शकत नाही. जिथे क्रिकेट आहे तिथे विक्रम आहेत. प्रत्येक एक सामन्यात छोटा-मोठा का होईना परंतू एक तरी विक्रम होतोच. कधी कधी खेळाडूकडून योगायोगाने असाही विक्रम होतो, जो त्याने पूर्वीही केलेला असतो. त्यामुळे क्रिकेटचे चाहते त्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघतात. जसे की, आज हा दिवस आहे तर अमुक-अमुक खेळाडू चांगला खेळणार. असे बरेच प्रसंग आपण पाहत असतो. असाच एक प्रसंग भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसोबत घडला आहे.
आज जगभरात शमीच्या नावाची चर्चा खूपच होत आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शमीने न्यूझीलंडविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच शमीने अचूक टप्पा पकडून गोलंदाजी केली. शमीने पहिल्या सत्रात न्यूझीलंड संघाचे दोन खेळाडू बाद केले. त्या नंतरच्या सत्रात आणखी २ खेळाडू बाद केले. अनुभवाचा चांगला वापर करून शमीने २६ षटकात ७६ धावा देऊन ४ विकेट्स मिळवले.
आजच्या दिवशी केलेल्या कामगिरीमुळे क्रिकेटच्या चाहत्यांना २०१९च्या विश्वचषकाची आठवण झाली. बरोबर २ वर्षांपूर्वी म्हणजे २२ जूनला सुद्धा शमीने अफगाणिस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात धुमाकूळ घातला होता. शमीने अफगाणिस्थान विरुद्ध जबरदस्त गोलंदाजी करत ४० धावा खर्च करून ४ विकेट्स खिशात घातल्या होत्या. या ४ विकेट्समध्ये खास गोष्ट अशी होती की, अतितटीच्या क्षणाला शमीने हॅट्रिक काढली होती.
भारत विरुद्ध अफगाणिस्थानच्या सामन्यात अफगाणिस्थान संघाला विजयासाठी १६ धावांची गरज होती. त्या षटकात शमीने अफलातून गोलंदाजी करत भारतीय संघाला ११ धावांनी विजय मिळवून दिला होता. त्यामुळेच आयसीसीच्या दोन्ही स्पर्धेत केलेल्या प्रदर्शनामुळे २२ जून ही तारीख नेहमीच शमीच्या लक्षात राहील यात काही शंकाच नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
सोने दो मुझे… सेहवागने विलियम्सनच्या संथ फलंदाजीची उडवली खिल्ली, पाहून व्हाल लोटपोट
जेव्हा राखीव दिवशीही पावसाने केली होती फलंदाजी, भारताला संयुक्त जेतेपदावर मानावे लागले समाधान
लाईव्ह सामन्यात दर्शक देत होते न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना शिव्या, तपास लागताच काढलं स्टेडियमबाहेर