टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेनंतर अनेक भारतीय खेळाडूंना विश्रांती दिली गेली. यामुळे न्यूझीलंड दौऱ्यास विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, आर अश्विन इत्यादी मुकले. आता भारत बांगलादेशच्या दौऱ्यावर असून यामध्ये तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरूवात 4 डिसेंबरपासून होणार असून त्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे.
पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) बांगलादेशच्या संपूर्ण वनडे मालिकेला मुकणार असून कसोटी मालिकेतही खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. बीसीसीआयच्या सुत्राने शनिवारी (3 डिसेंबर) ही माहिती दिली. टी20 विश्वचषकानंतर केलेल्या सरावादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली असल्याचे समोर येत आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, “ऑस्ट्रेलियातील टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर सराव सुरू केल्यानंतर मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाली आहे. त्याला एनसीएमध्ये अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे आणि 1 डिसेंबरला तो संघासोबत नव्हता.”
संघातून आधीच जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर आहे, आता शमीही दुखापतग्रस्त झाल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. तो जर कसोटी मालिकेला मुकला तर भारताच्या कसोटी अजिंक्यपदाच्या प्रवास कठीण होईल. कारण या स्पर्धेचा अंतिम सामना पुढील वर्षी जूनमध्ये ओव्हलवर खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला बांगलादेशविरुद्ध दोन्ही कसोटी सामने जिंकावे लागणार आहे.
सध्या इंडिया ए संघातील मुकेश कुमार आणि नवदीप सैनी हे शमीचे पर्याय आहेत, मात्र मुकेशने पदार्पण देखील केले नाही तर दुसरीकडे सैनीला केवळ दोन सामन्यांचाच अनुभव आहे. त्याने 2021-22च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेतून भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा आधीच बाहेर झाला आहे. त्याच्या जागी सौरभ कुमार हा पर्यायी खेळाडू आहे, ज्याने इंडिया ए सोबत बांगलादेश ए विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली.
बांगलादेशच्या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना 14 डिसेंबर आणि दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरला खेळला जाणार आहे. कसोटीमध्ये शमीने 60 सामन्यात 216 विकेट्स घेतल्या आहेत.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएल राहुल, रिषभ पंत, श्रीकर भरत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी (संभाव्य), उमेश यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज..
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शाहबाझ अहमद केएल राहुल, रिषभ पंत, इशान किशन, कुलदीप सेन, मोहम्मद शमी (मालिकेतून बाहेर), शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, दीपक चाहर. Mohammed Shami ruled out of the ODI series against Bangladesh
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
देशप्रेमापोटी मेजर ध्यानचंद यांनी नाकारली होती चक्क हिटलरची ऑफर; वाचा त्यांच्याबद्दलच्या रोमांचक गोष्टी
FIFA WC 2022: कॅमरूनने ब्राझीलचा विजयरथ थांबवत रचला इतिहास, स्वित्झर्लंड सुपर-16मध्ये