टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं शुक्रवारी (11 ऑक्टोबर) तेलंगणा पोलिसात पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) पदाची सूत्रं स्वीकारली. तेलंगणा पोलिसांनी सिराजबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. परंतु थोड्या वेळात ती हटवण्यात आली.
मोहम्मद सिराज यानं डीएसपी पद स्वीकारल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं आभार मानलं. सिराजनं गेल्या काही काळापासून टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. 2024 टी20 विश्वचषकातील भारताच्या विजयात त्याचं मोठं योगदान होतं. त्यामुळे त्याला हे पद देण्यात आलं.
वास्तविक, 2024 टी20 विश्वचषक विजयानंतर तेलंगणा सरकारनं मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती. आता त्याला तेलंगणा पोलिसात डीएसपी पदाची जबाबदारी मिळाली आहे. त्यानं या पदाची जबाबदारी स्वीकारली देखील. याचा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर कोणताही परिणाम होणार नाही. सिराज अजूनही टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे.
सिराजला नोकरीसह जमीन देण्याचंही आश्वासन देण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिराजला हैदराबादमध्ये घरासाठी जमीन देण्यात आली आहे. भारताच्या टी20 विश्वचषक विजेत्या संघात सिराज तेलंगणाचा एकमेव क्रिकेटपटू होता. शिवाय तो भारतीय संघाचाही महत्त्वाचा सदस्य आहे. तो नुकताच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला होता.
मोहम्मद सिराजच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यानं आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. तो मेहनतीच्या जोरावर पुढे आला. सिराजनं प्रथम देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. यानंतर त्यानं टीम इंडियात स्थान मिळवलं. त्यानं आयपीएलमध्येही दमदार कामगिरी केली.
मोहम्मद सिराजची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही उत्कृष्ट राहिली आहे. त्यानं टीम इंडियासाठी 29 कसोटी सामने, ज्यात त्यानं 78 विकेट्स घेतल्या. 15 धावांत 6 विकेट्स ही सिराजची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय त्यानं भारतासाठी 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 71 विकेट घेतल्या आहेत. सिराजनं 16 टी20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत, ज्यात त्यानं 14 विकेट घेतल्या.
हेही वाचा –
बाबर आझमनं कसोटीमध्ये शेवटचं अर्धशतक कधी ठोकलं होतं? अशा प्रकारे बनला हिरोचा झिरो!
पाकिस्तानच्या कर्णधाराची हकालपट्टी? लाजिरवाण्या पराभवानंतर पीसीबी घेणार मोठा निर्णय
बीसीसीआयनं बदलले क्रिकेटचे नियम, या स्पर्धेपासून होणार लागू