पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन सर्वांना चकित केले. आमिरने अद्याप कोणत्याही आयपीएल हंगामात भाग घेतला नाही. मोहम्मद आमिर याने नुकताच ब्रिटनच्या नागरिकतेसाठी अर्ज केला आहे. जर त्याला हे नागरिकत्व मिळाले तर तो यापुढे पाकिस्तानचा नागरिक राहणार नाहीत. त्यानंतर नियमांनुसार तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पात्र होईल.
“सहा-सात वर्ष खेळण्याची माझी योजना”
आमिरने पाक पॅशनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी सध्या युनायटेड किंगडममध्ये राहण्यासाठी अनिश्चित रजेवर आहे. मला क्रिकेटचा आणखी आनंद घ्यायचा असून पुढील ६ ते ७ वर्षे खेळण्याची माझी योजना आहे. गोष्टी कशा घडतात ते पाहूया.”
मोहम्मद आमिरची पत्नी आणि मूल आधीपासून युकेमध्ये आहे. हे कुटुंब नवीन जीवन सुरू करण्याचा विचार करीत आहे. आमिर पुढे म्हणाला, “माझी मुलं इंग्लंडमध्ये मोठी होतील आणि तिथेच शिक्षण पूर्ण करतील. त्यामुळे मी बराच काळ तेथे राहील यात शंका नाही. याक्षणी मी इतर शक्यता आणि संधींचा खरोखर विचार केला नाही. ब्रिटीश नागरिकत्व मिळाल्यानंतर भविष्यात गोष्टी कशा असतील याची मला माहिती नाही.”
मागील वर्षी आमिरने घेतली निवृत्ती
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. टीम मॅनेजमेंटकडून योग्य आदर मिळत नसल्याचा आरोप त्याने केला होता. आमिरने पाकिस्तानकडून ३६ कसोटी, ६१ वनडे आणि ५० टी२० सामने खेळले आहेत. आमीरने २०१९ मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
आयपीएलच्या पहिल्या हंगामानंतर कोणताही पाकिस्तानी क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळला नाही. सर्व गोष्टी योग्यरीत्या घडल्या तर मोहम्मद ब्रिटिश नागरिकत्वाद्वारे आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतो. यापूर्वी, अझर मेहमूदने ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारल्यानंतर आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
“मोठ्या दुःखाने सांगावे लागत आहे की…”, आरपी सिंगने वडीलांच्या निधनानंतर लिहिला भावूक संदेश
भारतीय संघातील खेळाडू ‘या’ कारणामुळे लवकरच मुंबईत जमणार एकत्र
ईद मुबारक! भारतीय कर्णधार विराट कोहलीने ‘या’ संदेशासह देशवासीयांना दिल्या ईदच्या शुभेच्छा




