भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा बहुप्रतिक्षित सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ दाखवत पाच गड्यांनी विजय मिळवला. भारतीय संघाच्या या विजयानंतर अनेक दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सामन्याचा नायक ठरलेल्या हार्दिक पंड्याचे देखील अनेक जण कौतुक करतायेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने देखील हार्दिकचे केले होते. मात्र, हेच कौतुक केल्याने आता अनेक जण त्याच्यावर टीका करत आहेत.
भारत-पाकिस्तान सामन्यात सामनावीर ठरलेल्या हार्दिकने प्रथम गोलंदाजी करताना आपल्या 4 षटकात फक्त 25 रन देऊन पाकिस्तानचे रिझवान, दिलखुश आणि इफ्तिकार हे तीन महत्त्वाचे फलंदाज टिपले. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अडचणीत असताना अगदी कोणताही खराब फटका न मारता सहाव्या स्थानावर फलंदाजी करताना 17 चेंडूमध्ये 4 चौकार आणि एक षटकार मारत त्याने भारतीय संघाला दोन चेंडू राखून विजय मिळवून दिला. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
Well played brother ???? https://t.co/j9QPWe72fR
— Mohammad Amir (@iamamirofficial) August 29, 2022
या कामगिरीनंतर स्वतः हार्दिकने एक ट्विट केले होते. तेच ट्विट रिट्विट करत आमिरने ‘वेल प्लेड ब्रदर’ असे लिहिले होते. हार्दिकचे हे कौतुक पाकिस्तानी चाहत्यांना आवडले नाही. त्यांनी त्यावर कमेंट करत लिहिले, ‘हेच कौतुक नसीम शहाचे केले असते तर आवडले असते.’ अन्य एका चाहत्याने लिहिले,
“तू फिक्सर होता आणि फिक्सरच राहशील”
आमिर याचे अनेक भारतीय खेळाडूंची अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे अनेकदा त्याला अशाप्रकारे ट्रोल व्हावे लागते.
हार्दिक पंड्या हा आयपीएल 2022 पासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्याच नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने आपल्या पहिल्याच हंगामात आयपीएलच्या विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध टी20 मालिका आपल्या नावे केली होती.






