न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यादरम्यान टी२० मालिकेतील दुसरा सामना सेडन पार्कवर संपन्न झाला. यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानला ९ गड्यांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला सोबतच, पाकिस्तानचा सर्वात अनुभवी फलंदाज मोहम्मद हफिज हा काहीसा दुर्दैवी राहिला. त्याच्यावर अत्यंत दुर्दैवीरित्या ९९ धावांवर नाबाद राहण्याची नामुष्की आली. अशाप्रकारे, आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ९९ धावांवर बाद किंवा नाबाद राहणारा तो चौथा फलंदाज ठरला.
पाकिस्तानी फलंदाजांनी केली हाराकिरी
हॅमिल्टनच्या सेडन पार्क मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. असद शाफिक व हैदर अली झटपट बाद झाल्यानंतर, मोहम्मद रिजवान व मोहम्मद हफिज यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. मात्र, रिजवान हा देखील फार काळ हफिजची साथ देऊ शकला नाही. दुसऱ्या बाजूने नियमित गडी बाद होत असताना, हफिजने आपला अनुभव पणाला लावत एक बाजू लावून धरत पाकिस्तानला सामन्यात जिवंत ठेवले.
अशा पद्धतीने हुकले शतक
अखेरच्या षटकात हफिजला आपले शतक पूर्ण करण्यासाठी १८ धावांची आवश्यकता होती. कायले जेमीसन टाकत असलेल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हफिज केवळ एक धाव काढू शकला. दुसऱ्या चेंडूवर इमाद वसीमने एक धाव काढत पुन्हा हफिजला संधी दिली. तिसरा चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर मात्र हफिजने षटकार, चौकार आणि षटकार वसूल करत १६ धावा काढल्या. परंतु, दुर्दैवाने त्यांची वैयक्तिक धावसंख्या ९९ पर्यंत पोहोचू शकली.
पाकिस्तानने निर्धारित २० षटकात १६३ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडकडून सलामीवीर टिम सिफर्ट व कर्णधार केन विलियम्सन यांनी अनुक्रमे ८४ व ५७ धावा काढत न्यूझीलंडला ९ गड्यांनी विजय मिळवून दिला.
कमनशिबी खेळाडूंत सामील झाला हफिज
या नाबाद ९९ धावांच्या खेळीनंतर हफिज त्या चार कमनशिबी खेळाडूंमध्ये सामील झाला जे आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ९९ धावांवर बाद किंवा नाबाद राहिले आहेत. इंग्लंडचा एलेक्स हेल्स हा आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सर्वप्रथम ९९ धावांवर बाद झाला होता. २०१२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याच्यावर ही नामुष्की आली होती. इंग्लंडचाच ल्युक राईट हा २०१२ टी२० विश्वचषकावेळी अफगाणिस्तान विरुद्ध ९९ धावांवर नाबाद राहिला होता.
काही दिवसांपूर्वीच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० सामन्यात इंग्लंडचा डेविड मलान हा ९९ धावांवर नाबाद राहीलेला. त्यानंतर, आज हफिज या खेळाडूंच्या यादीत सामील झाला. विशेष म्हणजे या यादीतील पहिले तीनही खेळाडू इंग्लंडचेच आहेत.
महत्वाच्या बातम्या:
– मोहम्मद शमी मालिकेबाहेर, या गोलंदाजाला विनाविलंब ऑस्ट्रेलियाला पाठवा, गावसकरांची आग्रही मागणी
– ही माणसं माझ्याबाबत लोकांच्या मनात विष भरत होती; तडकाफडकी निवृत्तीनंतर आमिरचा धक्कादायक खुलासा
– शिक्कामोर्तब! कोरोनानंतरही याच मैदानावर होईल भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी