अफगाणिस्तान क्रिकेटला जागतिक पातळीवर एक ओळख मिळवून देण्यात अष्टपैलू मोहम्मद नबी याचा मोठा वाटा आहे. अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासून नबी संघाचा अविभाज्य घटक आहे. आज अफगाणिस्तान क्रिकेटचा दर्जा दिवसेंदिवस उंचावत चालला असून अनेक युवा क्रिकेटपटू अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. यामध्ये लवकरच आणखी एक नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. हे नाव दुसरेतिसरे कोणी नसून हसन खान हे आहे. तो मोहम्मद नबीचा मुलगा आहे.
हसनने वडिलांच्या पावलावर ठेवले पाऊल
आपल्या आक्रमक फलंदाजी व दर्जेदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला मोहम्मद नबी जगातील अव्वल अष्टपैलूंपैकी एक आहे. त्याच्या प्रमाणे त्याचा मुलगा हसन देखील क्रिकेटचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. नबीचा १६ वर्षीय मुलगा हसन खान हा शारजा क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतोय.
हसनने नुकतेच बुखातिर इलेव्हन संघासाठी खेळताना अवघ्या ३० चेंडूत ७१ धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये ७ उत्तुंग षटकारांचा समावेश होता.
अफगाणिस्तानसाठी खेळण्याचे स्वप्न
ही दमदार खेळी केल्यानंतर हसनने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मला वडिलांना खेळताना पाहायला आवडते. त्यांना खेळताना पाहूनच माझ्यामध्ये क्रिकेटची आवड निर्माण झाली. माझ्यावर त्यामुळे दबाव नसतो. मला त्यांच्याप्रमाणेच अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करायचे आहे. इतर प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचना देखील मी वडिलांना सांगतो. त्यानंतर ते त्यातील बारकावे समजून सांगत असतात.”
दिग्गज खेळाडू आहे नबी
अफगाणिस्तान क्रिकेटमधील आजवरचा सर्वात्कृष्ट खेळाडू म्हणून नबीकडे पाहिले जाते. त्याने अनेक वर्ष अफगाणिस्तानचे नेतृत्व देखील केले. नबी जगभरातील सर्व टी२० लीगमध्ये मागणी असलेला खेळाडू आहे. आयपीएलमध्ये तो २०१७ हंगामापासून सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
झहीर-युवराजसोबत केली कारकीर्दीची सुरुवात, मात्र ‘त्याला’ एका वर्षात जावे लागले संघाबाहेर
भारतीय संघात निवड झालेल्या नागवासवालाला बुमराहने दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला
एक वेळ अशी होती विनाकारणच रडायला यायचे, सानिया मिर्झाचा मोठा खुलासा