मोहन बागान सुपर जायंट्सने इतिहास रचला आहे. त्यांनी 2024-25 मध्ये इंडियन सुपर लीगचे विजेतेपद जिंकले आहे. मोहन बागान ही आरपीएसजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष संजीव गोयंका यांची टीम आहे. मोहन बागानने आपला शेवटचा सामना बेंगळुरू एफसी विरुद्ध खेळला. त्याचा सामना 2-1 असा झाला. दरम्यान लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) मोहन बागानच्या विजयाबद्दल संघाचे अभिनंदन केले.
आयएसएलच्या या हंगामाचा अंतिम सामना कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियमवर खेळवण्यात आला. अंतिम सामन्याच्या पहिल्या हाफपासून मोहन बागानने आक्रमक खेळ केला. संघाचा बलाढ्य खेळाडू दिमित्री पेट्राटोसने 29व्या मिनिटाला गोल करून आघाडी मिळवून दिली. याला उत्तर म्हणून बेंगळुरूनेही योग्य उत्तर दिले. पण पहिल्या सत्रात त्यांना एकही गोल करता आला नाही. यावेळी मोहन बागानचा गोलकीपर विशाल कैथीने शानदार कामगिरी केली.
दुसऱ्या हाफमध्ये बेंगळुरू एफसीने पुनरागमन केले. सुनील छेत्रीने संघाला बरोबरीत आणले. 62व्या मिनिटाला छेत्रीने हेडरद्वारे गोल केला. यानंतर, मोहन बागानने प्रतिहल्ला केला. त्यांच्यासाठी, जेसन कमिंग्जने 78व्या मिनिटाला गोल करून आघाडी मिळवून दिली. अशाप्रकारे, मोहन बागानने सामना 2-1 असा जिंकला आणि विजेतेपद पटकावले.
मोहन बागानच्या विजयानंतर, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) संघाचे अभिनंदन केले. तो म्हणाला, “आयएसएल विजयाबद्दल मोहन बागान आणि संजीव सरांचे अभिनंदन.”