भारत व इंग्लंड यांच्यादरम्यान शुक्रवारी सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेला रंग चढायला सुरुवात झाली आहे. आजी-माजी खेळाडूंनी या मालिकेविषयी चर्चा करत चांगलीच वातावरणनिर्मिती केली आहे. इंग्लंड संघाचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर यानेही या बहुप्रतिक्षित मालिकेविषयी मते मांडली आहेत. आगामी मालिकेत भारतीय फलंदाजांना भात करण्यासाठी काय करावे लागेल, याबाबतचा कानमंत्र पानेसरने इंग्लिश कर्णधार जो रूटला दिला आहे.
शुक्रवारी सुरू होईल इंग्लंडचा भारत दौरा
सन २०२१ या वर्षातील भारतीय क्रिकेट संघाची मायदेशातील पहिली कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध चेन्नई येथे सुरू होईल. भारतीय संघ जवळपास वर्षभराचा कालावधीनंतर मायदेशात कसोटी मालिका खेळेल. भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियात तर इंग्लंडने श्रीलंकेत कसोटी मालिका विजय साजरा केला आहे, त्यामुळे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष या ‘हाय वोल्टेज’ मालिकेकडे लागलेले दिसून येते. दोन्ही संघात दर्जेदार खेळाडू असल्याने जाणकार तसेच प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
भारतीय फलंदाजांना असे बाद करा
इंग्लंडच्या सर्वात यशस्वी फिरकीपटूंपैकी एक राहिलेल्या पानेसरने इंग्लंडमधील आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “इंग्लिश गोलंदाजांना भारतीय फलंदाजांना बाद करायचे असेल तर त्यांना जोखीम घेऊन पुढे येत फटके मारायला लावले पाहिजेत. एकाच वेळी जवळ आणि सीमारेषेवर क्षेत्ररक्षक असायला हवे. लॉंग ऑनचा खेळाडू तसेच कव्हर्समधील खेळाडू सतत तैनात ठेवायला हवेत.”
युवा फिरकीपटूंना दिले सल्ले
पानेसरने इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांना काही सल्ले दिले. तो म्हणाला, “गोलंदाजांनी गुडलेंथवर चेंडू ठेवायला हवा. वारंवार फ्लॅट गोलंदाजी केल्यास फलंदाजीसाठी सोपे जाते. त्यामुळे चेंडूला उंची देणे गरजेचे आहे. चेंडूला हवा दिल्यास फलंदाज मोठा फटका खेळण्यासाठी पुढे येतो. चेंडू मऊसर झाल्यानंतर आर्मबॉल व क्रॉस सीम चेंडू सातत्याने टाकू नयेत.”
पानेसरने भारतात केली होती दमदार कामगिरी
भारतीय वंशाच्या पानेसरने इंग्लंडसाठी ५० कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंडने भारतात जिंकलेल्या २०१२ मालिकावेळी चार सामन्यात पानेसरने १७ बळी आपल्या नावे केले होते. सध्या तो समालोचनाचे काम करतो.
महत्वाच्या बातम्या:
कदाचित भारत ३-० किंवा ४-० फरकाने इंग्लंडला पराभूत करेल, इंग्लंडच्या दिग्गजाची भविष्यवाणी
ऑस्ट्रेलियन भूमीवरील भारताचा विजय अतुलनीय! पाहा कोणी केलंय कौतुक
इंग्लिश गोलंदाजांचा सामना करण्यासाठी किंग कोहलीची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ