अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघांत मालिकेतील चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने एक डाव आणि २५ धावांनी इंग्लंडला पराभूत केले आहे. यासह ३-१ ची आघाडी घेत यजमानांनी ही कसोटी मालिका आपल्या नावे केली. या विजयाबरोबरच भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात मजल मारली. हा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडदरम्यान खेळवला जाईल. इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर याने या सामन्यातील विजेत्याची आत्ताच भविष्यवाणी केली आहे.
पानेसरने सांगितला अंतिम सामन्याचा विजेता
इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर याने जून महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. त्याने एका मुलाखतीत या सामन्यात कोणता संघ विजेता होईल याबाबत अंदाज लावला.
पानेसर म्हणाला, “माझ्यामते जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडवर वरचढ ठरेल. ते या स्पर्धेचे विजेतेपद पटकावू शकतात. भारताचा संघ सर्वोत्तम आहे आणि त्यांनी नजीकच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवलेली आहे. न्यूझीलंडचा संघ देखील संतुलित भासतो.”
पानेसरने अंतिम सामन्यातील खेळपट्टीविषयी बोलताना सांगितले, “इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना जास्त फायदा होतो. परंतु येथे फिरकी गोलंदाजांनाही मदत होईल. मला वाटते की, अंतिम सामना चार-पाच दिवस चालेल कारण हा या स्पर्धेचा पहिलाच अंतिम सामना असेल. या सामन्यासाठी फलंदाजांना पोषक अशी सपाट खेळपट्टी दिली जाऊ शकते.”
मॉन्टी पानेसर सध्या भारतामध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज खेळण्यासाठी आला आहे. केविन पीटरसन नेतृत्व करत असलेल्या इंग्लंड लिजेंड्स संघाचे तो प्रतिनिधित्व करेल.
लॉर्ड्सवर खेळवला जाईल अंतिम सामना
आयसीसीने १ ऑगस्ट २०१९ पासून सुरू केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर खेळवला जाईल. या सामन्यात भारताचे नेतृत्व विराट कोहली तर न्यूझीलंडचे नेतृत्व केन विल्यमसन करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचे अभिनंदन करताना सेहवागचे ‘हटके’ ट्विट; म्हणाला, ‘इंग्लंड अहमदाबादमध्ये हरला नाही तर…’
विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, कर्णधारांच्या ‘या’ यादीत पटकावले दुसरे स्थान