---Advertisement---

भारताविरुद्ध शतकी खेळी करत वॉर्नरने गेलला टाकले मागे, आता केवळ सचिन तेंडुलकर आहे पुढे

On: मंगळवार, जानेवारी 14, 2020 8:49 PM
---Advertisement---

मुंबई। आज(14 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाला सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंचने 256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद 258 धावांची भागीदारी करत सहज विजय मिळवून दिला. फिंच आणि वॉर्नर या दोघांनीही शतकी खेळी केली. या शतकी खेळीबरोबरच वॉर्नरने मोठा विक्रम केला आहे.

वॉर्नरचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून 43 वे शतक आहे. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सलामीवीर फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेलला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे. गेलने सलामीला फलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 42 शतके केली आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करताना 45 शतके केली आहेत.

मुंबईत आज पार पडलेल्या सामन्यात वॉर्नरने 112 चेंडूत नाबाद 128 धावा केल्या. यामध्ये त्याने 17 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच फिंचने 114 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारासह नाबाद 110 धावा केल्या.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.1 षटकात सर्वबाद 255 धावा केल्या होत्या. भारताकडून शिखर धवनने 91 चेंडूत 74 धावा केल्या. तसेच त्याला केएल राहुलने चांगली साथ देताना 47 धावांची खेळी केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे सलामीवीर फलंदाज –

45 शतके – सचिन तेंडुलकर

43 शतके – डेव्हिड वॉर्नर

42 शतके – ख्रिस गेल

https://twitter.com/Maha_Sports/status/1217100875476262912

https://twitter.com/Maha_Sports/status/1217095829791469574

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---