साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात द रोज बाऊल स्टेडियमवर आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. या सामन्यात भारताच्या कर्णधार-उपकर्णधाराच्या जोडीने म्हणजेच विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या जोडीने एक खास विश्वविक्रम केला आहे.
विराट-रहाणेचा विश्वविक्रम
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत भारताकडून सलामीला रोहित शर्मा आणि शुबमन गिल फलंदाजीला उतरले. या दोघांनीही अर्धशतकी सलामी दिली. हे दोघे एका धावेच्या अंतराने बाद झाले. त्यानंतर चेतेश्वर पुजाराही ८ धावांवर माघारी परतला. त्यामुळे भारताच्या डावाची जबाबदारी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेवर आली. या दोघांनीही ही जबाबदारी चांगल्याप्रकारे सांभाळताना चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली.
त्यामुळे त्यांच्यावर नावावर कसोटीत सर्वाधिकवेळा चौथ्या विकेटसाठी ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी करणारी जोडी म्हणून विश्वविक्रम नोंदवला गेला. विराट आणि रहाणेने कसोटीमध्ये आत्तापर्यंत ४६ डावात चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचली आहे. त्यातील २२ वेळा त्यांनी चौथ्या विकेटसाठी ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे.
त्यांनी कसोटीत सर्वाधिकवेळा चौथ्या विकेटसाठी ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी करणाऱ्या जोड्यांच्या यादीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या मिस्बाह-उल-हक आणि युनुस खान यांची बरोबरी केली आहे. त्यांनीही हा पराक्रम २२ वेळा केला आहे. तसेच त्यांच्या पाठोपाठ या यादीत इंझमाम-उल-हक आणि मोहम्मद युनुस आहे. त्यांनी २० वेळा हा कारनामा केला आहे.
कसोटीत चौथ्या विकेटसाठी सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी करणाऱ्या जोड्या-
२२ – विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे (४६ डाव)
२२ – मिस्बाह-उल-हक आणि युनुस खान (५१ डाव)
२० – इंजमाम-उल-हक आणि मोहम्मद युसुफ (५० डाव)
१९ – स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ (५३ डाव)
१८ – सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर (४४ डाव)
भारताचा डाव गडगडला
विराट आणि रहाणे बाद झाल्यानंतर भारताचे अन्य फलंदाज फार काही करु शकले नाहीत. केवळ आर अश्विनने २२ आणि रविंद्र जडेजाने १५ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही फार काही करता आले नाही. त्यामुळे भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडने पहिल्या डावात चांगली सुरुवात केली. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवे आणि टॉम लॅथमने ७० धावांची सलामी भागीदारी केली. लॅथम ३० धावांवर बाद झाला. तर कॉनवे ५४ धावांवर बाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाखेर २ बाद १०१ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् अचानकपणे ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला WTC फायनलमध्ये खेळत नसलेला भुवनेश्वर कुमार, ‘हे’ आहे कारण
“…त्या दिवशी मी क्रिकेट खेळणे सोडून देईल”, आर अश्विनचे मोठे वक्तव्य
विराट आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरतो! पाहा ‘ही’ आकडेवारी