आयपीएल २०२० च्या हंगामात रविवारी(२७ सप्टेंबर) किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स संघात रोमांचक सामना पहायला मिळाला. शारजाहमध्ये पार पडलेल्या या सामन्यात पंबाजने दिलेल्या २२४ धावांचे आव्हान राजस्थानने १९.३ षटकात यशस्वी पूर्ण करत सर्वांना आश्चर्यकित केले. राजस्थानने मिळवलेल्या या विजयात राहुल तेवतियाचा महत्त्वाचा वाटा होता.
त्याने ३१ चेंडूत ७ षटकारांसह ५३ धावा केल्या. यातील ३० धावा त्याने शेल्डन कॉट्रेलच्या गोलंदाजीवर १८ व्या षटकात तब्बल ५ षटकार मारत काढल्या. यामुळे त्याने एक खास विक्रम केला आहे.
त्याने आयपीएलमध्ये एका सामन्यात चौकार न मारता सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या नितिश राणा आणि संजू सॅमसनची बरोबरी केली आहे. राणानेही किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच २०१७ मध्ये खेळताना एकही चौकार न मारता ७ षटकार मारले होते. तसेच २०१७ मध्ये संजू सॅमसनने दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना गुजरात लायन्सविरुद्ध एकही चौकार न मारता ७ षटकार मारले होते.
या यादीत संजू सॅमसन, नितिश राणा, राहुल तेवतिया पाठोपाठ डेव्हिड मिलर आणि आंद्रे रसल संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मिलरने राजस्थानविरुद्ध तर रसलने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना एकही चौकार न मारता ६ षटकार मारले होते.
एका आयपीएल सामन्यात चौकार न मारता सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –
७ षटकार – राहुल तेवतिया विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब
७ षटकार – नितिश राणा विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब
७ षटकार – संजू सॅमसन विरुद्ध गुजरात लायन्स
६ षटकार – डेव्हिड मिलर विरुद्ध राजस्थान रॉयल्स
६ षटकार – आंद्रे रसल विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स