क्रिकेटच्या खेळात सामन्याचे पारडे क्षणाक्षणाला बदलत असते. एखादा संघ वरचढ असताना एका षटकाने, एका झेलने किंवा एका चेंडूने सुद्धा सामन्याची दिशा पालटू शकते. जर सामना उत्कंठावर्धक चालला असेल आणि एखादी अक्षम्य चूक घडली तर ? तश्या, क्रिकेटच्या मैदानावर या तीन चुका महागात पडतात. चुकीचा फटका, सोडलेला झेल आणि नो बॉल !
चुकीचा फटका मारल्याने कपिल देव यांना बाहेर बसावे लागले होते, तर हर्षल गिब्सने स्टीव वॉचा सोडलेला झेल १९९९ च्या विश्वचषकाच्या रूपाने द. आफ्रिकेच्या हातून निसटला. नो बॉलमुळे तर असंख्य सामने अनेक संघांना गमवावे लागले. उदाहरणार्थ, प्रत्येकाला भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी२० विश्वचषक २०१६ च्या उपांत्य सामना आठवत असेल.जिथे हार्दिक पांड्या आणि रविचंद्रन अश्विनच्या नो बॉलमुळे भारताला घरच्या मैदानात पराभवाचे तोंड पाहावे लागले. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नो बॉलने हातातोंडाशी आलेली ट्रॉफी गमवावी लागली.
१९९० च्याआधी अनेक गोलंदाज नो बॉल टाकत परंतु कधीकधी ते मोजले जात नसत. सर इयान बोथम, कपिल देव, डेनिस लिली यासारख्या दिग्गजांनी नो बॉल टाकले नाहीत असे म्हणतात परंतु ते सत्य नाहीये. या सर्वांनी नोबॉल टाकले आहेत फक्त त्यावेळी तंत्रज्ञान नसल्याने याचे पुरावे उपलब्ध नाहीत. तसेच कपिल देव यांनी कारकिर्दीतील पहिल्याच कसोटी सामन्यात नो-बॉल टाकल्याचा व्हिडीओ युट्यूबवर उपलब्ध आहे.
२१व्या शतकात कसोटीत नो-बॉल न टाकणारे दोन गोलंदाज
या पलीकडे, दोन असे गोलंदाज आहे, ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये कधीही नोबॉल टाकले नाहीत. यातील एक गोलंदाज भारतीय आहे तर एक इंग्लंडचा. याची सर्व माहिती असण्याचे कारण म्हणजे या दोघांनीही आपले सर्व क्रिकेट सामने २१ व्या शतकात खेळले आणि त्याच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण झाले. तसेच आकडेवारी लक्षात ठेवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध होते. त्यामध्ये, त्याने एकही नो बॉल टाकला नाही हे स्पष्ट होते. ते दोन खेळाडू म्हणजे एक भारताचा आर आश्विन तर दुसरा इंग्लंडचा ग्रॅमी स्वाॅन.
आर आश्विनने कसोटी कारकिर्दीत ७१ कसोटी सामन्यात १३२ डावांत गोलंदाजी करताना ३२६४.२ षटके गोलंदाजी केली. यात त्याने कधीही नोबॉल टाकला नाही. कसोटीत सर्वाधिक षटके एकही नोबॉल न टाकता टाकण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. २०११ ते २०२० या काळात त्याने हा कारनामा केला आहे. त्याच्या या विक्रमाची नोंद गिनेस बुकमध्येही आहे.
दुसऱ्या स्थानावर ग्रॅमी स्वाॅन-
पुर्वी हा विक्रम २०१३ला क्रिकेटला अलविदा केलेल्या इंग्लंडच्या ग्रॅमी स्वाॅनच्या नावावर होता. त्याने कसोटीत २५०० षटके गोलंदाजी करताना एकही नो बॉल टाकला नव्हता.
ग्रॅमी स्वाॅनबद्दल थोडक्यात-
१९९८ च्या एकोणीस वर्षाखालील युवकांच्या, विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाचा सदस्य असलेल्या ऑफस्पिनर स्वानने, जानेवारी २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडेमध्ये इंग्लंडकडून पदार्पण केले. त्या सामन्यातील खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आलं. तो पुन्हा काउंटी खेळू लागला २००४ पर्यंत नॉर्थहेम्पटनशायरसाठी खेळल्यानंतर पुढील मोसमात तो नॉटिंघमशायरच्या संघात गेला. दोन वर्षात ढिगाने विकेट घेत त्याने २००७ मध्ये पुन्हा राष्ट्रीय संघात पुनरागमन केले
पुढच्याच वर्षे,२००८ मध्ये त्याने भारताविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. थोड्याच दिवसात कसोटी, वनडे आणि टी२० अशा क्रिकेटच्या तिनही प्रकारात तो इंग्लंडचा पहिल्या पसंतीचा फिरकीपटू झाला.
२००९ च्या अॅशेस विजयात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली होती. इंग्लंडने जिंकलेल्या २०१० टी२० विश्वचषक विजेत्या संघात त्याचा समावेश होता. त्या स्पर्धेत स्वानने १० बळी मिळवले. जे इंग्लंडमधील तेव्हाचे सर्वाधिक होते.
२०११ हे साल स्वानसाठी स्वप्नवत ठरले. त्यावर्षी त्याला ” सर्वोत्तम इंग्लिश क्रिकेटर” हा इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा मानाचा पुरस्कार मिळाला. सोबतच गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत तो कसोटी आणि वनडे प्रकारात अव्वल स्थानी राहिला. २०१२ साली त्याला कोपराच्या दुखापतीने ग्रासले. २०१३-१४ च्या अॅशेस दरम्यान त्याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
ग्रॅम स्वानने इंग्लंडसाठी ६० कसोटी, ७९ वनडे आणि ३९ टी२० सामने खेळले. त्यामध्ये त्याने अनुक्रमे २५५,१०४ व ५१ बळी मिळवले.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्वान सध्या स्काय न्यूज साठी क्रिकेटतज्ञ म्हणून काम करतो.