जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 10 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेचा 42वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघ भिडत आहेत. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अशात दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने खास विक्रम केला आहे. या विश्वचषकात 4 शतके ठोकणाऱ्या डी कॉकने आता यष्टीरक्षक म्हणून केलेल्या या विक्रमात भारताचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी याला मागे टाकले आहे.
डी कॉकचा विक्रम
नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) याने फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. यावेळी अफगाणिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी 94 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. पुढेही त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. अफगाणिस्तान संघाने डावातील 43व्या षटकांच्या खेळापर्यंत 7 विकेट्स गमावल्या. यातील 5 विकेट्स या क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याने यष्टीमागे घेतलेल्या झेलामुळे पडल्या. हे 5 झेल घेताच डी कॉकच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
वनडे विश्वचषकाच्या इतिहासात यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक झेल (Most catches by a wicket-keeper in World Cup) घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्विंटन डी कॉक याने तिसरे स्थान मिळवले. त्याच्या नावावर आता 35 विकेट्सची नोंद झाली आहे. डी कॉकने याबाबतीत धोनीला पछाडले आहे. धोनीने विश्वचषकाच्या इतिहासात यष्टीमागे 34 झेल पकडले होते. तसेच, याबाबतीत अव्वलस्थानी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ऍडम गिलख्रिस्ट आहे. त्याच्या नावावर यष्टीमागे एकूण 45 झेल आहेत. याव्यतिरिक्त दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा असून त्याने विश्वचषकात यष्टीमागे एकूण 41 झेल पकडले आहेत. (Most catches by a wicket-keeper in World Cup all time know list here)
विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेणारे यष्टीरक्षक
45 – ऍडम गिलख्रिस्ट
41 – कुमार संगकारा
35 – क्विंटन डी कॉक*
34 – एमएस धोनी
हेही वाचा-
दिनेश कार्तिकच्या खांद्यावर पुन्हा कर्णधारपदाची धुरा, ‘या’ संघाचं करणार नेतृत्व
‘प्रामाणिकपणे सांगतो, मला फरक पडत नाही…’, ICC वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 बनूनही असे का म्हणाला भारतीय धुरंधर?