जगातील सर्व टी२० लीगमधील सर्वात मोठी लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग. या लीगची सुरुवात २००८मध्ये झाली होती. तेव्हापासून ते २०१९ पर्यंत आयपीएलचे १२ हंगाम पूर्ण झाले आहेत. आयपीएलमुळे अगदी नवीन युवा खेळाडूंना स्टार आणि दिग्गज खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधीही उपलब्ध झाली. आयपीएल अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा देखील ठरला आहे.
आयपीएलमध्ये एकीकडे गोलंदाज लवकरात लवकर विकेट मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर फलंदाज जास्तीत जास्त स्ट्राईक रेटने धावा करताना दिसतो. या स्पर्धेमध्ये जेव्हा एखादा मोठा फलंदाज मैदानात येतो, तेव्हा त्याने लांब षटकार मारून आपले मनोरंजन करावे अशी चाहत्यांचीही अपेक्षा असते.
या लेखात आयपीएलमधील ५ सर्वात स्फोटक फलंदाजांबद्दल जाणून घेऊ ज्यांनी आयपीएलमध्ये वेगवान स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट असणारे हे ५ फलंदाज –
५. ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा अष्टपैलू मॅक्सवेलचा किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएल २०२० च्या लिलावात आपल्या संघात समावेश केला. त्याच्यासाठी रुपये १० कोटी ७५ लाख एवढी किंमत मोजली आहे. अष्टपैलू मॅक्सवेलच्या समावेशाने संघाकडे फिनिशर आणि गोलंदाजीचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध आहे.
यापूर्वी पंजाब आणि दिल्लीसाठी खेळणाऱ्या मॅक्सवेलने आयपीएलचे ६९ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २२.९० च्या सरासरीने आणि १६१.१३ च्या स्ट्राइक रेटने १३९७ धावा केल्या. त्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ९५ धावा आहे. मॅक्सवेलने ६ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. आता मॅक्सवेल आयपीएल २०२० मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसणार आहे.
४. रीषभ पंत (Rishabh Pant)
भारताचा हा खेळाडू आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल संघात खेळताना दिसतो. यष्टिरक्षक-फलंदाज रीषभ पंची आयपीएलमधील फलंदाजी उत्तम आहे. हा मॅच विनर खेळाडू आयपीएलमधील सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकात पंतने शानदार कामगिरी करून आयपीएलमधील संघमालकांना आकर्षित केले होते. त्याला, आयपीएल २०१६ मध्ये दिल्ली कॅपिटलने खरेदी केली.
त्याने आतापर्यंत ५४ सामन्यांत ३६.१६ च्या सरासरीने आणि १६२.६९ च्या स्फोटक स्ट्राइक रेटसह १७३६ धावा केल्या आहेत. त्याने आपल्या आयपीएलमध्ये एक शतक आणि ११ अर्धशतके झळकावली असून त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या नाबाद १२८ धावा अशी आहे.
३. मोईन अली (Moeen Ali)
इंग्लंडचा हा खेळाडू आयपीएलमध्ये विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमधून खेळताना दिसतो. तो आरसीबीसाठी सलामीवीरापासून ते फिनिशरच्या भूमिकेपर्यंत खेळताना दिसतो.
मोईन अली आतापर्यंत १६ आयपीएल सामने खेळला आहे. त्यात २४.७५ च्या सरासरीने आणि १६५.९२ च्या स्ट्राइक रेटने २९७ धावा केल्या आहेत. तर त्यात ३ अर्धशतकेही साकारले आहेत.
आयपीएलममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला फलंदाजी सोबतच मोईन अली गोलंदाजीसाठी देखील पर्याय म्हणून आहे. आयपीएल २०१८ च्या लिलावात आरसीबीने मोईन अलीला १ कोटी ७० लाख रुपयांत विकत घेतले आणि त्याचा समावेश त्यांच्या संघात केला आणि तो अजूनही संघाचा भाग आहे.
२. सुनील नारायण (Sunil Narine)
ऑफस्पिनर सुनील नारायण हा वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आहे. तर तो आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना दिसतो. खरं तर, आपल्या फिरकी गोलंदाजीमुळे विरोधी फलंदाजांना अस्वस्थ करण्याशिवाय सुनील आयपीएलमध्ये उत्तम फलंदाजीही करताना दिसतो.
२०१७ मध्ये आरसीबीविरुद्ध फलंदाजी करताना सुनील नारायणने ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यावेळी नारायणने १७ चेंडूत ५४ धावांची तुफानी खेळी केली होती. त्यानंतर नारायण केवळ गोलंदाजीसाठीच नव्हे तर फलंदाजीसाठीही प्रसिद्ध झाला आहे.
कोलकाता नाइट रायडर्सच्या स्फोटक खेळाडूने आतापर्यंत खेळलेल्या ११० आयपीएल सामन्यांमध्ये ५७ वेळा फलंदाजी केली आहे. आयपीएलमध्ये त्याने १६८.३४ च्या जबरदस्त स्ट्राइक रेट आणि १७.५२ च्या सरासरीने ७७१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ३ अर्धशतक केली आहेत. तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
१. आंद्रे रसेल (Andre Russell)
लांबच-लांब षटकारांसाठी ओळखला जाणारा आंद्रे रसेल, आयपीएलमधील सर्वात वेगवान स्ट्राइक रेटने फलंदाजी करणारा खेळाडू आहे. तो जेव्हा मैदानावर फलंदाजीस येतो, तेव्हा त्याच्या समोर कोणताही गोलंदाज असो, तो काहीच विचार करत नाही. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करणारा रसेल हा कोलकाता नाईट रायडर्सचा मॅच विनर खेळाडू आहे. आंद्रे रसेल आतापर्यंत ६४ आयपीएल सामने खेळला आहे, त्यामध्ये ५२ सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली.
त्याने १८६.४१ च्या जबरदस्त स्ट्राइक रेट आणि ३३.३३ च्या सरासरीने १४०० धावा केल्या आहेत. रसेलने आयपीएलमध्ये ८ अर्धशतकेही झळकावली आहेत. रसेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९६ चौकार आणि १२० षटकार ठोकले आहेत. या षटकार आणि चौकारांमधील फरक पाहून रसेलच्या स्फोटक फलंदाजीची कल्पना करता येऊ शकते.
ट्रेंडिंग लेख-
-टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
-अगदी सौरव तिवारीपासून ‘या’ ६ कर्णधारांच्या अंडर खेळलाय धोनी
-निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू