भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना इंदोर येथे खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तुफानी फलंदाजी करत 227 धावा उभारल्या. या सामन्यात भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तो या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. तो मालिकेत दुसऱ्यांदा खातेही न खोलता तंबूत परतला. यासोबतच अनेक नकोसे विक्रम त्याने आपल्या नावे केले.
दक्षिण आफ्रिकेने रायली रूसोचे शानदार शतक व क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या जोरावर 3 बाद 227 धावा काढल्या. प्रत्युत्तर हात भारतीय संघाला चांगल्या सलामीची अपेक्षा होती. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह रिषभ पंत सलामीला आला. दक्षिण आफ्रिकेसाठी पहिले शतक अनुभवी कगिसो रबाडाने टाकले. मात्र, भारतीय संघाला डावाच्या दुसऱ्या चेंडूवर धक्का बसला. रोहित चेंडू बचावत्मक पद्धतीने खेळण्याच्या नादात चेंडूने बॅटची आतली कड घेतली व तो यष्ट्यांवर जाऊन आदळला. मालिकेत दुसऱ्यांदा रबाडाने त्याला शून्यावर बाद केले.
या शून्यासोबतच रोहित भारताकडून सर्वाधिक वेळा टी20 क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला. तो 10 व्यांदा खाते खोलू शकला नाही. या यादीमध्ये केएल राहुल 5 वेळा शून्यावर बाद होत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेला विराट कोहली 4 वेळा झाला आहे. कर्णधार म्हणून देखील टी20 क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत रोहितने विराटला मागे टाकले. रोहित चौथ्यांदा तर विराट तीन वेळा शून्यावर बाद झाला होता. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने 62 सामन्यात भारताचे नेतृत्व करताना एकदाही शून्यावर तंबूचा रस्ता धरला नव्हता.