भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी२० विश्वचषक २०२१ चा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने योग्य सिद्ध केला. पहिल्या षटकात शाहिनने चौथ्या चेंडूवर खाते उघडण्यापूर्वी रोहित शर्माला पायचीत केले. यानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शाहीनने केएल राहुलला त्रिफळाचीत केले. दरम्यान, रोहित शर्माच्या नावे एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मास सात वेळेस आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये शुन्यावप बाद झाला आहे. यातील तो तीनवेळा पहिल्याच चेंडूवर म्हणजे गोल्डन डक झाला आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये रोहित पाठोपाठ केएल राहुल आहे. तो चार वेळा शुन्यावर बाद झाला आहे. यानंतर विराट कोहली, रिषभ पंत, युसुफ पठाण, सुरेश रैना, आशिष नेहरा आणि वॉशिंग्टन सुंदर हे सर्व खेळाडू प्रत्येकी तीन वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.
रोहित शर्मा पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाच्या सामन्यात गोल्डन डकचा शिकार ठरला आहे. यापूर्वी दिनेश कार्तिक २००७ च्या टी२० विश्वचषकात, तर मुरली विजय आणि आशिष नेहरा २०१० च्या टी२० विश्वचषकात गोल्डन डकवर बाद झाले होते. २०१६ सालच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत सुरेश रैनाला गोल्डन डक मिळाला होता.
दरम्यान, रविवारी(२४ ऑक्टोबर) भारताची सुरुवात चांगली झाली नाही. प्रथम विराट कोहलीने नाणेफेक गमावली. त्यानंतर भारतीय संघाने सहा धावांच्या आत रोहित शर्मा (०) आणि केएल राहुल (३) या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या.
सूर्यकुमार यादवने (११) बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर षटकार मारून आत्मविश्वास निर्माण केला, पण हसन अलीच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानने विकेटच्या मागे उत्कृष्ट झेल देऊन त्याचा डाव संपुष्टात आणला. पॉवरप्लेनंतर भारताचा स्कोअर तीन विकेटवर ३६ धावा होता. भारतीय संघाने ९ षटकांत ५० धावा गाठल्या.
हसन अलीविरुद्ध एका हाताने षटकार मारण्याचे कौशल्य ऋषभ पंतने दाखवले. डावाच्या १२व्या षटकात, त्याने स्क्वेअर लेगवर षटकार मारले. पंतला लेगस्पिनर शादाब खानने बाद केले. पंतने ३० चेंडूत ३९ धावा केल्या. कोहलीने ४५ चेंडूत अर्धशतक झळकावले, मात्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रवींद्र जडेजा (१३) संघर्ष करताना दिसला. हार्दिक पंड्यालाही फक्त ११ धावा करता आल्या.
कोहलीने ४९ चेंडूंचा सामना केला. आपल्या ५७ धावांच्या खेळीत त्याने ५ चौकार आणि एक षटकार लगावला. भारतीय संघाने निर्धारित २० षटकात १५१ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानकडून सलामीला उतरलेल्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने भारतीय गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व राखले. या दोघांनीही शेवटपर्यंत एकही विकेट न देता संघाला १७.५ षटकात १५२ धावा करुन देत विजय मिळवून दिला. बाबरने नाबाद ६८ आणि रिझवानने नाबाद ७९ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
शाकीब उल हसनने रचला इतिहास! टी२० विश्वचषकातील ठरला सर्वात यशस्वी गोलंदाज
पाकिस्तानविरुद्ध भारतीय सलामीवीरांची साफ निराशा, आयसीसी स्पर्धेत तिसऱ्यांदाच घडली ‘अशी’ गोष्ट
विराटचं अर्धशतक ठरलं विश्वविक्रमी! ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेललाही टाकले मागे






