दुबई। क्रिकेट चाहत्यांसाठी रविवार (१४ नोव्हेंबर) मोठी पर्वणी असणार आहे. कारण रविवारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या शेजारी देशात सातव्या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडणार आहे. न्यूझीलंड सलग तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यास सज्ज आहे, तर ऑस्ट्रेलिया ६ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांतील एक खास योगायोग समोर आला आहे. या योगायोगाचा विचार केल्यास ऍरॉन फिंच नेतृत्व करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला टी२० विश्वचषक २०२१ चे विजेतेपद मिळण्याची संधी आहे.
तो योगायोग असा की २०११ पासून आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचलेल्या संघांपैकी ज्या संघांचे कर्णधार सामन्यापूर्वीच्या फोटोशूटवेळी ट्रॉफीच्या डाव्या बाजूला उभे राहिले आहेत, त्यांनी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. या योगायोगाला केवळ २०१४ चा टी२० विश्वचषक अपवाद ठरला आहे.
साल २०१४ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका संघ पोहचले होते. तेव्हा भारताचा कर्णधार एमएस धोनी ट्रॉफीच्या डाव्या बाजूला आणि श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगा उजव्या बाजूला उभा होता. तो टी२० विश्वचषक श्रीलंकेने जिंकला होता.
टी२० विश्वचषक २०१४ स्पर्धेव्यतिरिक्त २०११ वनडे विश्वचषक, २०१२ टी२० विश्वचषक, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१५ वनडे विश्वचषक, २०१६ टी२० विश्वचषक, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९ वनडे विश्वचषक आणि २०१९-२०२१ कसोटी अजिंक्यपद या स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या फोटोशूटमध्ये ट्रॉफीच्या डाव्या बाजूला उभे असलेल्या कर्णधाराचा संघ विजेता झाला आहे.
आता, टी२० विश्वचषक २०२१ च्या अंतिम सामन्यापूर्वी केलेल्या फोटोशूटमध्ये ट्रॉफीच्या डाव्या बाजूला ऑस्ट्रेलियाचा ऍरॉन फिंच उभा आहे, तर उजव्या बाजूला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन उभा आहे. आता, जर गेल्या १० वर्षांतील योगायोगाचा विचार केल्यास फिंचला विजेतेपद मिळण्याची शक्यता जास्त आहे. पण, विलियम्सनला मलिंगाप्रमाणे इतिहास घडवण्याची संधी आहे. आता या दोन कर्णधारांपैकी कोण बाजी मारणार हे पाहावे लागेल.
https://www.instagram.com/p/CWQOtk5r_SL/
रविवारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
घरवापसी! विराट पत्नी अनुष्का अन् लेकीसह युएईतून परतला मुंबईत, पाहा व्हिडिओ
सावधान! तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरमूळे विराटचा सात वर्ष जुना विक्रम धोक्यात
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!